
जुन्या वैमनस्यातून गुंडाची हत्या
नागपूर : सिव्हिल लाईन्ससारख्या सुरक्षित परिसरात पूर्व वैमनस्यातून गुन्हेगाराची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री आरोपींनी आकाश ऊर्फ डुंबक सुरेश नेवारे (वय २५, रा. तेलंगखेडी, गोंडटोली) याला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर त्याला दारू पाजली. तो मद्यधुंद झाल्यानंतर शस्त्रांनी हल्ला केला. तब्बल २४ वार झाल्याने आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकाशचा भाऊ पंकज नेवारे यांच्या तक्रारीवरून परिसरातच राहणाऱ्या पीयूष ऊर्फ पेडा बघेल (वय २२), विशाल ऊर्फ बब्बू काल्या चचाने (वय २५) आणि रणजित ऊर्फ रंजू गोपाल महतो (वय २५, रा. सुदामनगरी) यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पानटपरी बंद करून गेला अन्…
आकाश काही दिवसांपासून रविनगर बसस्थानकाजवळ पानटपरी चालवत होता. रविवारी रात्री पानटपरी बंद करून तो घरी पोहोचला. रात्री सुमारे ११ वाजता आरोपींनी त्याला देशपांडे सभागृह आणि सातपुडा लॉनच्या दरम्यान असलेल्या गल्लीत भेटण्यासाठी बोलावले. तेथे सर्वांनी रात्री सुमारे १ वाजेपर्यंत मद्यप्राशन केले. आकाश मद्यधुंद झाल्यानंतर आरोपींनी त्याला घेरले आणि धारदार शस्त्रांनी सपासप वार केले.
गुन्हे शाखेच्या पथकाची तातडीने कारवाई
आकाश आणि आरोपींमधील वादाची माहिती पोलिसांना आधीच होती. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाने रात्रीच तिन्ही आरोपींना अटक केली. मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून आरोपी आकाशसोबत सातत्याने वाद घालत होते. रविनगर परिसरात पानटपरी लावण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचेही सांगितले.
आकाश नेवारेविरोधात अनेक गंभीर गुन्हे
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश नेवारेविरुद्ध हत्या, मारहाण, चोरी, अपहरण आणि घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल होते. जुलै महिन्यात ट्रॅफिक पार्कजवळ आकाश आणि साथीदार जेम्स यांच्यासह काही जणांनी पीयूषला मारहाण केली होती. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. सुमारे १५ दिवसांपूर्वी पीयूष आणि विशाल यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. आकाश आपली माहिती पोलिसांना देत असल्याचा संशय पीयूषला होता. जामिनावर बाहेर आल्यापासून तो आकाशला संपवण्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.