
शिक्रापूर-चाकण मार्गावर भीषण अपघात; दोन्ही चालक गंभीर जखमी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे शिक्रापूर-चाकण मार्गावर दोन मालवाहू कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून, दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिस आणि नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४३ सीक्यू ८८०३ हा कंटेनर शिक्रापूरहून चाकणच्या दिशेने, तर एमएच ४६ बीवी ९५८७ हा कंटेनर चाकणहून शिक्रापूरच्या दिशेने जात होता. पिंपळे जगताप येथे दोन्ही कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे पुढील भाग एकमेकांच्या केबिनमध्ये अडकले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार सुजित जगताप, नागेश वाघमारे, गणेश येळवंडे तसेच करंदी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दरेकर, महेश साबळे, सोमनाथ सोनवणे, अमोल राठोड यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी एका कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला आहेर काढण्यासाठी सुमारे अर्धा तास प्रयत्न करावे लागले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच ४३ सीक्यू ८८०३ क्रमांकाच्या कंटेनरने समोरील वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. तसेच एमएच ४६ बीची ९५८७ या कंटेनरमध्ये सुमारे दहा टन वजनाच्या लोखंडी कॉईल होत्या. त्या बांधलेल्या साखळ्या तुटल्याने कॉईल केबिनवर आदळल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अपघातग्रस्त वाहने हटवली रस्त्याच्या बाजूला
अपघातामुळे दोन्ही बाजूंना वाहतूक कोडी झाली होती. पोलिस आणि नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आली. या अपघातात एमएच ४३ सीक्यू ८८०३ या कंटेनरचा चालक दिलीप यादव (रा. पनवेल, मुंबई) आणि एमएच ४६ बीबी ९५८७ या कंटेनरचा चालक अली अहमद (रा. पुणे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर अनुक्रमे ससून रुग्णालय आणि खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.
Varsova Crime : वर्सोव्यात आढळला पोत्यात बांधलेला तरुणाचा मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?