फोटो सौजन्य- प्रतिनिधी
किरण बाथम /रायगड :- महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी घटना वाढत चालल्या आहेत. खून, बलात्कार, मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत. अनधिकृत प्रकाराला जर विरोध केल्यास तर विरोध करणाऱ्या व्यक्तीलाच धमकाविले जाते मारहाण केली जाते . असाच प्रकार पनवेल येथील तळोजा औद्योगिक परिसरामध्ये घडला आहे. मंदिराच्या शेजारी अवैध दारुचा अड्डा सुरु असताना त्याविरोधात निषेध केला तर शिवमंदिराची तोडफोड केली गेली आणि पुजाऱ्याला धमकाविण्यात आले आहे.
दारू माफिया आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे संगमत
पनवेल तळोजा औद्योगिक परिसरातील तळोजा औद्योगिक (एमआयडीसी) परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांवर दारूची सर्रास विक्री सुरू आहे.तळोजा इंडस्ट्रीयल (एमआयडीसी) परिसरातील पोलीस वाहतूक चौकीच्या मागे असलेल्या शिवमंदिराजवळील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या विक्रेत्यावर रात्री उशिरा आणि पहाटे दारूविक्री सुरू असते. एवढेच नव्हे तर दारू माफिया उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या संगनमताने एकाच दुकानाऐवजी अनेक शाखा सुरू करून अवैधरित्या दारूविक्री करत आहेत.
त्याचवेळी विभागीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध दारू दुकानांबरोबरच शिवमंदिराच्या शेजारी चिकन शॉप्सही सुरू आहेत. रात्री उशिरा विक्रेत्यांकडून होत असलेल्या अवैध दारूविक्रीबाबत नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना इशाराही दिला आहे. असे असतानाही विभागातील अधिकाऱ्यांचे तेथे दुर्लक्ष केले जाते आहे.
शिवमंदिराचीही तोडफोड, लोकांच्या भावना तीव्र
अवैधरित्या सुरू असलेले दारूचे दुकान बंद करण्याबाबत शिवमंदिराच्या पुजाऱ्याने वारंवार तक्रार करूनही कारवाई झाली नाही. मात्र त्याला धमकाविण्यात आले आहे. तसेच या शिवमंदिराचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे अवैध धंद्याविरुध्द आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अवैध धंदा करणाऱ्यांना जर मोकाट सोडले तर असे धंदे येथे वाढण्याची शक्यता आहे. स्थानिकांना या धंद्याचा त्रास होत असताना पोलिस प्रशानसाने हे असले दारुचे अड्डे उधवस्त केले पाहिजेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हे धंदे करणारे लोक परिसरामध्ये दहशतीचे वातावरण तयार करत आहेत आणि मंदिराबाजूला असे काळेधंदे सुरु असल्याने लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.