Uttar Pradesh News: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या आदमपूर परिसरातून एटीएसने पाकिस्तानी गुप्तहेर मोहम्मद तुफैलला अटक केली आहे. त्याच्यावर भारतातील संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा माहिती पाकिस्तानसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. मोहम्मद तुफैलच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी त्याच्याशी संबंधित अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे.
आदमपूरमध्ये राहणारे राम प्रकाश सांगतात, “तुफैल अनेक वर्षांपासून आपल्या मामांसोबत राहत होता. तो शांत स्वभावाचा वाटायचा. त्याच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या व्यवसायात गुंतलेले असत. घरात कार्यक्रम असला की अनेक लोक एकत्र यायचे. याशिवाय, कुटुंबातील काही सदस्यांनी २-३ वेळा हज यात्राही केली आहे. मात्र तुफैल फारसा कुणाशी मिसळत नसे. तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करेल, असे कधीच वाटले नव्हते.” एक अन्य शेजारी विनोद यांनी सांगितले, “तुफैलचे पोशाख आणि वर्तन खूपच संशयास्पद वाटायचे. त्याच्या बोलण्यातून आणि हावभावांतून गजवा-ए-हिंदसारख्या विचारसरणीचे प्रतिबिंब दिसत होते.”
या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना मोहम्मद तुफैलचा चुलत भाऊ सकलेन यांनी सांगितले की, “आमच्या कुटुंबातील कोणाचाही पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. तुफैलने कसा आणि कुठून संपर्क ठेवला, याची कुणालाही कल्पना नव्हती. परंतु त्याच्यावर लावलेले आरोप खरे ठरले, तर ते निश्चितच गंभीर पाप ठरेल. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होणे आम्ही कधीच स्वीकारू शकत नाही. व्हिडिओ शेअर करणं असो किंवा संवेदनशील माहिती पाठवणं असो, तुफैल पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची कोणालाही शंका नव्हती. देशाची फसवणूक करणाऱ्यांच्या बाजूने आम्ही कधीच उभे राहणार नाही. कायदा या प्रकरणात जो निर्णय घेईल, तो आम्ही पूर्णपणे स्वीकारू.”
दिल्लीतील आयएसआय स्लीपर सेलचा भांडाफोड
दरम्यान, जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या कालावधीत केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी अत्यंत गोपनीय मोहिम राबवून राजधानी दिल्लीत कार्यरत असलेले आयएसआयचे स्लीपर सेल नेटवर्क उध्वस्त केले. या कारवाईत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलचा देखील सहभाग होता. या मोहिमेदरम्यान, नेपाळी वंशाचा अन्सारुल मियां अन्सारी नावाचा संशयित हेर दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आला. तो पाकिस्तानात पलायन करण्याच्या तयारीत होता.
गोपनीय कागदपत्रांसह अटक
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अन्सारुलच्या ताब्यातून भारतीय सैन्य आणि सशस्त्र दलांशी संबंधित अत्यंत संवेदनशील दस्तऐवज जप्त करण्यात आले. फॉरेन्सिक तपासणीत या कागदपत्रांच्या मूळतेची पुष्टी झाली असून, त्यांची माहिती पाकिस्तानला पाठवण्यासाठी सीडी तयार करण्याचे आदेश अन्सारुलला आयएसआयकडून मिळाले होते.
Rahul Gandhi : तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का सरसळतं? राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल
कतार ते पाकिस्तान – एका षड्यंत्राची सुरुवात
चौकशीदरम्यान, अन्सारुलने कबूल केले की तो कतारमध्ये कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत असताना एका आयएसआय एजंटच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याला पाकिस्तानात नेण्यात आले, जिथे त्याचे ब्रेनवॉश करून गुप्त प्रशिक्षण देण्यात आले. भारतात परतल्यानंतर तो नेपाळमार्गे दिल्लीला पोहोचला. त्याचे मुख्य उद्दिष्ट होते भारतीय लष्कराशी संबंधित माहिती गोळा करून ती पाकिस्तानला पोहोचवणे.
रांचीमध्ये सहकाऱ्याला अटक
अन्सारुलच्या खुलाशांनंतर केंद्रीय यंत्रणांनी झारखंडच्या रांची येथून अखलाक आझम नावाच्या व्यक्तीला अटक केली. तो अन्सारुलला पाकिस्तानमधील आयएसआय अधिकाऱ्यांपर्यंत गोपनीय कागदपत्रे पोहोचवण्यात मदत करत होता. तपासातून समोर आले की हे स्लीपर सेल नेटवर्क दिल्लीपासून रांचीपर्यंत कार्यरत होते.
स्लीपर सेल म्हणजे काय?
स्लीपर सेल म्हणजे असे व्यक्ती वा गट जे सामान्य नागरिक म्हणून दीर्घकाळ राहत असतात, परंतु वेळ आल्यावर हेरगिरी किंवा दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय होतात. अशा एजंटांना विशेष प्रशिक्षण दिले जाते आणि संवेदनशील माहिती संकलित करून ती शत्रुराष्ट्राकडे पाठवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.