Panchgani Crime News: थंड हवेचे पर्यटनस्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला पोलीस असल्याचे भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, शिवीगाळ आणि मारहाण केली. यानंतर पीडित शेडगे यांना मुंबईत नेऊन रात्रीभर कैद करून “वाद मिटवा, नाहीतर जेलमध्ये टाकू” अशी धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेण्यात आला. या प्रकरणी भरत घरतसह चौघांविरोधात अपहरण, मारहाण आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील भोसे येथील संतोष लक्ष्मण शेडगे यांचे १७ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिवॉल्व्हरच्या धाकावर अपहरण करण्यात आले.शेडगे यांच्या प्लॉट क्रमांक ५९ समोर त्यांच्या गाडीला अडवून पाच अनोळखी इसमांनी स्वतःला नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगितले. “तुझ्यावर अटक वॉरंट आहे” अशी धमकी देत आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. धमकी देत आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. गाडी महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडे नेण्याऐवजी त्यांनी ती थेट पोलादपूरमार्गे मुंबईकडे वळवली. या प्रकरणी भरत घरतसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महाबळेश्वर पोलीस करत आहेत.
दरम्यान, शेडगे यांनी विरोध केल्यानंतर त्यांना मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. पुढे तुर्भे येथे भरत अनंत घरत व इतर साथीदारांच्या मदतीने शेडगे यांना घरात ठेवण्यात आले. रात्रीभर धमक्या देत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. “वाद मिटवा, नाहीतर जेलमध्ये टाकू” अशी थेट धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेतला. एवढेच नव्हे तर मोबाईलवर चित्रीकरण करून ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेडगे यांनी आपल्या जबाबात केला आहे. आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भरत घरत व त्याच्या साथीदारांनी रिवॉल्व्हरच्या धाकावर जीव घेण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी भरत घरतसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी संतोष शेडगे यांनी भरत घरत व इतर अनोळखी इसमांविरोधात अपहरण, मारहाण, धमकी देणे तसेच जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेणे अशा गंभीर गुन्ह्यांची तक्रार पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, या अपहरण आणि धमकी प्रकरणात मुख्य आरोपी भरत याच्याच नातेवाइकांपैकी एक मोठा राजकीय पुढारी सामील असल्याचे संतोष शेडगे यांनी सांगितले. त्याच्यावरही चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दौंड तालुक्यातील पडवी येथे हायवाने दाम्पत्याला चिरडले; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी…
साताऱ्यासह महाबळेश्वर-पाचगणीत घडलेल्या या संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या घटनेमुळे मोठा सवाल निर्माण झाला आहे. दिवसाढवळ्या शांत पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी परिसरात पोलिस असल्याचे भासवत अपहरण आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांवर कायद्याचा पाडाव कितपत लवकर होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. पाचगणीत अशा पोलीस व गुंड प्रवृत्तीचे लोक शांतता भंग करत असतील, तर त्यांचा तातडीने शोध घेऊन संबंधित आरोपींना गजाआड करावे, अशी मागणी आरपीआय (ए) गटाचे पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे अध्यक्ष संग्रामदादा रोकडे यांनी केली आहे.