दौलतगनर येथे तब्बल ५ लाखांची घरफोडी
सातारा : सातार्यातील दौलतगनर येथील बंद घर चोरट्यांनी टार्गेट करुन 13 तोळे वजनाचे लाखो रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केले. घरफोडीच्या या घटनेने दौलतनगर हादरले असून, वकील महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुध्द तक्रार दिली आहे.
ऍड. पूनम चंद्रशेखर इनामदार (वय ६६, रा. दौलतनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरीची ही घटना ५ जून ते १० जून या कालावधीत घडली. चोरट्यांनी बंद घराचा सेफ्टी लोखंडी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. इनामदार कुटुंबियांनी किचन कट्ट्याच्या खाली स्टीलच्या डब्यामध्ये सोन्या-चांदीचे ठेवले होते. तो सर्व ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
चोरी झालेल्या ऐवजांमध्ये ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची ५ ग्रॅम वजनाची अंगठी, ३० हजाराचे ६ ग्रॅमचे कानातले, १ लाखाचे ३० ग्रॅमचे बांगड्या, ४० हजाराचे १५ ग्रॅमचे पदक, ३० हजाराचे १२ ग्रॅमचे पदक, १ लाखाच्या ४ तोळे वजनाच्या ९ अंगठ्या असा मुद्देमाल चोरी झाला आहे. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करुन पंचनामा केला. ठसेतज्ञ तसेच इतर बोलावून तपासणी केली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करत आहेत.
पुण्यातही चोरीची घटना
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. मध्यभागात चोरट्यांनी एका सराफा बाजारातील कारागिराला पत्ता विचारण्याच्या बहाणा करून त्याच्या हातातील 20 लाखांचे दागिने असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवार पेठेतील मोती चौक परिसरात ही घटना घडली आहे.