Purandar Crime: पुरंदर तालुक्यात बेकायदा सावकारकी बोकाळली; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, थेट...
सासवड: पुरंदर तालुक्यात बेकायदा सावकारकी मोठ्या प्रमाणात बोकाळली असून अनेकांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत होता. मात्र त्यांच्या विरोधात जाहीरपणे कोणी पुढे येत नसल्याने या प्रकरणांना उघडपणे वाचा फुटत नव्हती. मात्र मागील वर्षातील शेवटच्या डिसेंबर महिन्यात जेजुरी पोलीस ठाण्यात तब्बल सात जणांविरोधात सावकारकीचा प्रथमच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सासवड पोलिसांमध्ये जानेवारी महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात तब्बल तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एका प्रकरणात शंतनू भाऊसाहेब झगडे,( रा. हडको रोड सासवड) याच्या विरोधात एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेने पतीच्या उपचारासाठी लागणारे पैसे भरण्यासाठी बचत गटातून ५० हजार तसेच नातेवाईकांकडून २५ हजार रुपये घेतले होते. दरम्यान फेब्रुवारी २०२३ मध्ये आरोपी शंतनू झगडे याच्याकडे फिर्यादी महिलेने एक लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर आरोपीने गाडी गहाण ठेवण्यासाठी आहे का? अशी विचारणा केली त्यावर महिलेने नाही म्हणाल्यावर कोरा चेक सही करून द्या आणि महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीला एक लाख रुपये देवून दरमहा १७ तारखेला दहा हजार देण्याचे ठरले. मार्च २०२३ ते मी २०२४ पर्यंत त्यांनी ९३ हजार रुपये रोख स्वरुपात दिले.
त्यानंतर जून २०२४ मध्ये ५० हजार रुपयांचा चेक दिला. तसेच उर्वरित ५० हजारसाठी दोन महिन्यांची मुदत मागितली. तरीही आरोपी झगडे याने महिला आणि तिच्या पतीला धमकी दिली. तसेच घरी येत तिच्या मानस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. महिलेने आरोपीला १ लाख ९३ हजार रुपये दिले तरीही त्यांना कोरा चेक परत न देता आणखी ७० हजारांची मागणी केली. त्यास महिलेने नकार देताच ३ जानेवारी रोजी चेक बाउन्स ची नोटीस दिली. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात सावकार विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात बोपगाव येथील भानुदास बाळासो गोफणे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासवड जवळील ताथेवाडीमधील महेश प्रकाश जगताप आणि रमेश प्रकाश जगताप या दोन सख्या सावकार भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला पैशांची अडचण असल्याने त्यांनी भिवडी गावचा मित्र नरेश भिवा मोकाशी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावर नरेश मोकाशी यांनी व्याजाने पैसे देणारे सासवड मधील रमेश जगताप व महेश जगताप यांच्याशी ओळख करून दिली.
दरम्यान आरोपींनी फिर्यादीला चार लाख रुपये देतो पण त्याबदल्यात काहीतरी तारण आणि या रकमेचे १० टक्के व्याज दरमहा ४० हजार द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीचा मित्र नरेश मोकाशी याने त्याची भिवडी येथील शेतजमीन गट नंबर ६३१ मधील ११ गुंठे इतके क्षेत्र आरोपी महेश जगताप याच्या नवे खरेदीखत करून दिले. त्यानंतर फिर्यादीस चार लाख रुपये दिले.
त्यानंतर फिर्यादीने आरोपींना वेळोवेळी १० टक्के व्याजाने ७ लाख २८ हजार रुपये दिले. तसेच आणखी ४ लाख रुपये व्याजाच्या रकमेची मागणी करीत होते. तसेह ही रक्कम न दिल्यास हातपाय तोडण्याची तसेच सासवड मध्ये फिरू न देण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपीने पोलिसांत फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा: सासवडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; उद्योजकांची घरे टार्गेटवर
तिसऱ्या प्रकरणात एका महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी मोहन हरिश्चंद्र जगताप, रा. माऊली सोसायटी, सासवड, ता. पुरंदर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सदर महिलेचा हॉटेलचा व्यवसाय असून जेवणाचे डबे पुरविण्याचे काम करीत आहे. आरोपी मोहन जगताप आणि त्याच्या मुलाला त्यांच्या हॉटेलमधून जेवणाचा डबा सुरु होता. त्याची ओळख असल्याने फिर्यादी महिलेच्या पतीने आरोपीकडून व्यावसायसाठी ३० हजार रुपये घेतले होते. तसेच २०२४ मध्ये सर्व पैसे परत केले होते. असे असताना आरोपी महिलेकडे ३० हजार रुपयांच्या व्याजाची मागणी करीत होता.
तसेच त्यांच्याकडे सुरु असलेल्या मंथली मेसचे आरोपी आणि त्याच्या मुलाचे दोन महिन्यांचे १० हजार देण्यास नकार दिला. दरम्यान १ जानेवारी रोजी दुपारी आरोपी हॉटेलमध्ये दारू पिऊन आल्यावर त्यास मेसच्या पैशांची मागणी केली असता तिच्याशी अश्लील वर्तन केले आणि पैसे देत नाही, काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जावळे पुढील तपास करीत आहेत.