
Nashik Accident News:जिवलग मित्रांचा तो चित्रपट ठरला अखेरचा; मध्यरात्री बुलेटचा जीपला धडक, एकाचा मृत्यू अन्...
चित्रपटानंतर घरी परतताना अपघात
जय भवानी रोडवरील जाचकनगर, सत्यम पार्क परिसरात राहणारे पियुष आणि अनुराग यांच्यासह त्यांचे अन्य दोन मित्र शुक्रवारी रात्री दोन दुचाकींवरून चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट संपल्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास पियुष आणि अनुराग बुलेटवरून घरी परतत होते. पियुष दुचाकी चालवत होता.
जीपला जोरदार धडक
शिवाजीनगर परिसरात त्यांच्या बुलेटची मालवाहू जीपला जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही मित्र गंभीर जखमी होऊन रस्त्यालगत पडले. अपघाताची तीव्रता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, जीपचालकाने वाहन थांबवून जखमींना मदत करण्याऐवजी वाहनासह घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: Beed News: जनावरे चोरली, ट्रकमध्ये कोंबली अन् हरियाणाच्या दिशेने पलायन; बीडमध्ये पर्दाफाश
मित्रांनी केली तातडीने मदत
अपघातानंतर काही वेळातच पाठीमागून येणारे त्यांचे दोन मित्र घटनास्थळी पोहोचले. त्यांना पियुष आणि अनुराग रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. त्यांनी तातडीने नातेवाईक आणि अन्य मित्रांना माहिती देत दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान पियुषचा मृत्यू
रुग्णालयात उपचार सुरू असताना पियुष मोरे याचा मृत्यू झाला. अनुराग दुबे यांच्यावर उपचार सुरू आहेत. पियुष पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर जाचकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा: Scam News: चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून विश्वास जिंकला अन् 22 लाखांना गंडा घातला
जीपचालकाचा शोध सुरू
अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या जीपचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अपघाताचा तपास केला जात असून, नेमका अपघात कशामुळे झाला आणि जीपचालकाची भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे.