Mulshi Crime News: मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणवर यापूर्वीही गुन्हा दाखल कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चव्हाण याच्यावर पत्नीचा अमानुष छळ आणि आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचे गंभीर आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये पत्नीचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी निलेश चव्हाण याचे लग्न झाले. पण अवघ्या काही महिन्यातच त्याने आपल्या पत्नीवर नजर ठेवण्यास सुरूवात केली. घरातील बेडरुममधील कोपऱ्यांमध्ये, फॅनमध्ये, एअर कंडिशन यांमध्ये त्याने गुप्त कॅमेरे लावले होते. जेव्हा त्याच्या पत्नीने निलेशचा लॅपटॉप पाहिला, त्याचवेळी त्यात काही खासगी क्षणांचे व्हिडीओ असल्याचे आढळून आले. याशिवाय त्यात इतर महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओही सापडले. असा आरोप निलेश चव्हाणच्या पत्नीने केला होता.
पुरोगामी पुण्यात 207 ‘वैष्णवीं’नी संपवले जीवन..! छळ ‘ती’चा संपतच नाही…
या घाणेरड्या प्रकाराबाबत जेव्हा निलेशला त्याच्या पत्नीने जाब विचारला त्यावेळी त्याने तिला धमकावले, तिचा गळा दाबला, आणि जबरदस्तीने शारिरीक संबंधही प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर, तिने निलेशच्या आईवडिलांनाही ही गोष्ट सांगितली, पण त्यानंतर तिच्या सासू-सासऱ्यांनीही तिचा छळ सुरू केला. निलेशच्या पत्नीनेही सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून निलेश आणि नातेवाईकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
१४ जून २०२२ रोजी निलेश आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे, पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. पण त्या नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातही निलेश चव्हाणचे नवे कारनामे समोर आले आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे १० महिन्यांचे बाळ निलेश चव्हाणकडे होते. वैष्णवीच्या माहेरचे लोक बाळाचा ताबा घेण्यासाठी तिथे गेले असता, निलेश चव्हाण याने पिस्तुलाचा धाक दाखवून बाळ देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणीही त्याच्याविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणेचा जवळचा मित्र असल्याची माहिती आहे. वैष्णवी आणि शशांक यांच्यात होणाऱ्या वादात निलेशने अनेकदा मध्यस्थी किंवा हस्तक्षेप करायचा, असा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केला आहे. निलेश चव्हाणचा बांधकाम आणि पोकलेन मशीनचा व्यवसायिक आहे.