पिंपरी: शहरात दररोज पोलिसांकडून अमली पदार्था विरोधी कारवाई होत असतानाही गांजाच्या विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश येत नाहीये. त्यामुळे शहरात गांजाची सहज उपलब्धता झाल्याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळताना दिसत आहे.पिंपरी-चिंचवड व परिसरातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये हजारो तरुण परप्रांतातून तसेच राज्याच्या दूरदराज क्षेत्रातून नोकरीच्या शोधात आले आहेत.
महाविद्यालयीन वयातील तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात असून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. शहरातील झोपडपट्ट्यांपासून दुकानांपर्यंत खुलेआम गांजा व अन्य अमली पदार्थ विकले जात असल्याने हे तरुण सहज व्यसनाच्या आहारी जात आहेत. दरम्यान, पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाया केवळ कागदोपत्री न राहता त्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे.
कठोर कारवाईमुळेच शहराला गुन्हेगारी व व्यसनमुक्त करता येईल. गेल्या ४८ तासांत पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत गांजा विकणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. मात्र, या आरोपींपर्यंत गांजा पोहोचतो तरी कसा? हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न बनला आहे.
“शहरातील चौक, वस्त्या तसेच अनेक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पानमसाल्याच्या नावाखाली खुलेआम केली जात आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनासह पोलिस विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या विळख्यातून सुटका मिळवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे.”
गांजा वापरणं धोकादायक, पण वास्तव अजून भयानक; अभ्यासातून मृत्यूच आला समोर
चाकण पोलीस ठाण्यातील प्रकरण
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. झडती मध्ये त्याच्याकडून एक किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार (२८ मे) रोजी रात्री खेड़ तालुक्यातील नानेकरवाडी येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश सिंह अजय प्रताप सिंह ठाकूर (वय २६, रा. निघोजे, खेड) असे आहे. या प्रकरणी पोलीस नाईक भैरव यादव यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नानेकरवाडीत गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडले. चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकाश सिंह ठाकूरला अटक केली. झडतीमध्ये त्याच्याकडून ६०,५०० रुपये किमतीचा १ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चाकण पोलीस करत आहेत.
दिघीत युवकाकडून २५९ ग्रॅम गांजा जप्त
दिघी पोलिसांनी इंद्रायणी नगर येथे एका युवकाकडून १२,९५० रुपये किमतीचा २५९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव स्वामी भागवत माने (वय २३, रा. आळंदी) आहे. या प्रकरणी पोलीस नाईक योगेश नागरगोजे यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी स्वामी माने गांजा विक्रीसाठी इंद्रायणी नगर येथे आला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून गांजा सापडला.
डुडुळगाव येथून युवक अटकेत
शहरातील डुडुळगाव भागात दिघी पोलिसांनी गांजा विक्री प्रकरणी एका युवकाला अटक केली आहे. आरोपीकडून एकूण ८७७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ४३,८५० रुपये आहे. ही कारवाई सोमवारच्या रात्री उशिरा करण्यात आली. अटक आरोपीचे नाव गणेश नागेश लोणडे (वय २३, रा. चाकण) आहे. या प्रकरणी पोलीस नाईक सुधीर डोलस यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, डुडुळगाव मधील अडबंगनाथ चौकात गांजा विक्रीसाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला रंगेहाथ अटक केली.