
अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणे भोवलं; पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं
कराड : कराड उपविभागीय पोलिसांच्या पथकाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध कारवाई केली. यामध्ये गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, मोबाईल व दुचाकी असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय २५, रा. पालकरवाडा मंगळवारपेठ, कराड) व ओमकार दीपक जाधव (वय २२, रा. होली फॅमिली स्कूलजवळ, विद्यानगर, सैदापूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी कराड व मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध व्यवहार व अग्निशस्त्रधारकांविरोधात विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना शुक्रवारी (दि.७) खात्रीशीर माहिती मिळाली. त्यात दोन इसम सैदापूर/विद्यानगर कॅनॉल परिसरात अवैधरित्या बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून फिरत आहेत. त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी व ओमकार दीपक जाधव या संशयितांना ताब्यात घेतले.
हेदेखील वाचा : Gujrat Terror Activities: गुजरात ATSकडून मोठ्या दहशतावादी कटाचा पर्दाफाश; 3 संशयितांना अटक
दरम्यान, या कारवाईत त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, ६०० रुपयांचे जिवंत काडतूस, १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन, तसेच ७५ हजार रुपयांची दुचाकी असा एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.