Gujrat Terror Activities: गुजरात ATSकडून मोठ्या दहशतावादी कटाचा पर्दाफाश; 3 संशयितांना अटक
Gujrat ATS : गुजरातमधून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात एटीएस’ने एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे. गुजरात एटीएसने दहशतवादी संघटना आयसिसशी संबंधित तीन संशयितांना अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती. हे तिघे दहशतवादी देशात मोठ्या हल्ल्याचा कट रचत होते. शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्येही आले होते. अशी माहिती एटीएसच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघे पश्चिम उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत आणि एक हैदराबादचा आहे. हे तिघेही प्रशिक्षित दहशतवादी असून त्याचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे. या कारवाईनंतर एटीएस आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.
प्राथमिक तपासानुसार, अँटी टेररिझम स्क्वॉड (एटीएस)ने संशयित दहशतवाद्यांवर गेल्या एक वर्षापासून गुप्तपणे पाळत ठेवली होती. या कालावधीत त्यांच्या हालचाली व कारवायांवर एटीएसची बारकाईने नजर होती. पुरावे हाती आल्यानंतर एटीएस पथकाने तिघांनाही रंगेहात अटक केली. हे तिघेही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होते. त्यांच्या चौकशीतून इतर संभाव्य दहशतवादी कारवायांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 2024 मध्येही गुजरात एटीएसने अल कायदाशी संबंधित अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली होती. हे सर्व अल-कायदाच्या इंडियन सबकॉन्टिनेंट मॉड्यूलशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यापैकी दोन दहशतवादी गुजरातमधील, एक दिल्लीतील आणि एक नोएडामधील होता.
भारताने दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यापासून, दहशतवाद्यामंध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे देशात दहशतवादी कारवायासाठी ते गुप्तपणेकट रचत आहेत. पण भारतीय सुरक्षा दल पूर्णपणे सतर्क असून दहशतवाद्यांचे नापाक कट हाणून पाडत आहेत.
दरम्यान, काल (08 नोव्हेंबर) जम्मू आणि काश्मीरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनीही दोन दहशतवाद्यांना ठार मारले. कुपवाडा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देताना दोन दहशतवादी मारले गेले.






