बीड: आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. आज त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधून कडेकोट बंदोबस्तात त्याला बीडमध्ये आणण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, त्यानंतर त्याला शिरूर कासार येथील तालुका न्यायालयात हजर केले जाईल. त्याआधी शिरूर पोलीस ठाण्यात त्याची ओळख परेड होणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला उपजिल्हा रुग्णालय, शिरूर कासार येथे नेण्यात येणार असून, त्यानंतर न्यायालयात हजर केले जाईल.
मारहाण आणि शिकारीच्या आरोपांमुळे आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या चर्चेत आला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिरूरमध्ये ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केल्यानंतर तो फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराज, उत्तर प्रदेश येथून अटक केली असून, आज त्याला महाराष्ट्रात आणण्यात आले आहे.
बीडमध्ये मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्या विविध गैरकृत्यांची माहिती समोर आली. मारहाण, बेकायदेशीर शिकार आणि घरातून गांजा जप्त करण्यात आल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या कारवाईनंतर तो फरार झाला होता.
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज येथून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला प्रथम मुंबईत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला विमानाने आणण्यात आले. संभाजीनगरहून बीड पोलीस त्याला बाय रोड शिरूरकडे घेऊन गेले असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मारहाणीचे आणि पैसे उधळल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो फरार झाला. सर्वप्रथम तो अहिल्यानगरला गेला, तिथून पुण्यात आणि नंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगरला परतला. त्यानंतर तो ट्रॅव्हल्सने प्रयागराजला गेला. प्रयागराजमध्ये उतरून लपण्याचा प्रयत्न करत असतानाच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान, वन विभागानेही सतीश भोसलेच्या घरावर मोठी कारवाई केली. त्याचे घर स्वतःच्या मालकीच्या जागेवर नसून वन विभागाच्या हद्दीत असल्याचे उघड झाले. त्यामुळे वन विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. यापूर्वीच त्याला नोटीस देण्यात आली होती, आणि अखेर वन विभागाने त्याच्या घरावर बुलडोझर चालवत ते पाडले.