ठाण्यात उभारतंय देशातील पहिलं 11 मजली रेल्वे स्टेशन; मनोरंजन, शॉपिंगचीही असणार सुविधा
रेल्वेला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. मुंबई आणि लगतच्या शहरांना रेल्वे जाळ्याने जोडण्यात आलं आहे. इथल्या सामान्य माणसाचा दैनंदिन प्रवास शक्यतो रेल्वेनेच होतो. मुंबई , ठाणे परिसरातील दररोज लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असतात. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक ठाणे शहरात खास रेल्वे स्टेशन उभारण्यात येत आहे. एक दोन नाही तर तब्बल ११ मजली स्टेशन असून राज्यातीलच नाही, देशातील सर्वात मोठं बहुमजली स्टेशन असणार आहे. रेल्वेस्टेशनमधून प्रवाशांच्या प्रवासाचीच आरामदायक व्यवस्था नाही तर मनोरंजन, मॉल, ऑफिस आणि रिटेल शॉपचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारही हातभार लावत आहे.
विशेष म्हणजे देशातील पहिली प्रवासी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते ठाणे ( तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस) दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती. भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा आपल्या अनोख्या प्रकल्पासाठी ठाणे स्थानकाची निवड केली आहे.
ठाणे स्टेशनच्या पूर्वेला प्लॅटफॉर्म क्रमांक १० अ ला जोडणारी ११ मजली इमारत आरएलडीए (रेल्वे जमीन विकास प्राधिकरण) आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात येत आहे. हे रेल्वे स्थानक केवळ कनेक्टिव्हिटीच नाही तर प्रवाशांच्या इतर सुविधा आणि मनोरंजनाचाही विचार करून उभारलं जात आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासोबतच हा प्रकल्प सरकारसाठीही फायदेशीर ठरेल. रेल्वे स्थानकाजवळील कनेक्टिव्हिटीची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. बस आणि मेट्रोनेला देखील जोडलं जाणार आहे. प्रकल्प ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं रेल्वेचं लक्ष्य आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या प्लॅटफॉर्म १० अ ला जोडून ९,००० चौरस मीटर क्षेत्रात हा प्रकल्प विकसित केला जात आहे. यासोबतच, २४,२८० चौरस मीटरची भाडेतत्त्वावर जागा देखील असेल. ही जागा ६० वर्षांच्या भाडेतत्त्वार देण्याची योजना आहे.
रेल्वे स्थानकाच्या तळघरात पार्किंगची सुविधा दिली जाईल. यासोबतच येथे सर्व रेल्वे सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याला जोडून एक बस डेक बांधला जाईल, जिथून स्थानिक वाहतूक बसे सोडण्यात येणार आहेत. या सर्व सुविधा खालील २ मजल्यांवर उपलब्ध करून दिल्या जातील. वरचा मजला व्यावसायिक वापरासाठी वापरला जाईल. या मजल्यांवर शॉपिंग आणि रिटेल दुकाने बांधली जातील. वरच्या मजल्यावर फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स देखील बांधले जातील. येथे मुलांसाठी गेमिंग झोन असेल. कार्यालयासाठी एक मोठी जागा देखील तयार केली जात आहे. हॉटेल आणि सर्व्हिस अपार्टमेंट्स व्यतिरिक्त, येथे एक कोचिंग इन्स्टिट्यूट देखील उभारण्यात येणार आहे.
या स्थानकावरून रेल्वे व्यतिरिक्त, वाहतुकीच्या इतर साधनांशी देखील जोडण्यात येणार आहे. त्यावर २.२४ किमीचा सुसज्ज रस्ता बांधला जाईल, जो पूर्व द्रुतगती महामार्गाला थेट रेल्वे स्थानकाशी जोडेल. ठाणे पश्चिम ते पूर्व स्थानकाला जोडणारा सुमारे २.५० किमी लांबीचा निर्माणाधीन उड्डाणपूल देखील SETI द्वारे या इमारतीशी जोडला जाणार आहे. प्रवाशांना ट्रेनमधून उतरून बस पकडण्यासाठी दूर जावे लागू नये म्हणून बस वाहतुकीसाठी प्लॅटफॉर्म १० जवळ एक डेक बांधला जाईल. याशिवाय रिक्षा, टॅक्सी स्टँड आणि इतर खाजगी वाहतुकीच्या सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. येत्या १ वर्षात ठाणेकरांना इथून प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.