स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अडचणीत वाढ (फोटो -टीम नवराष्ट्र)
पुणे,: स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) तीन नव्या कलमांची पोलिसांनी वाढ केली आहे. पीडितेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि दोन वेळा जबरदस्तीने संभोग करणे या कारणांमुळे कलम ६४(२), ११५(२) आणि १२७ (२) अंतर्गत आरोपीवर अतिरिक्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आरोपीचे वीर्य, रक्त, नख आणि केस याचे नमुने संकलित करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
आरोपी आणि तक्रारदार तरुणीची डीएनए चाचणीसाठी करण्यासाठी सॅम्पल घेतले आहेत. तसेच, पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली असली तरी तिचा अंतिम अहवाल अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला आहे. तसेच, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला त्याच्या मूळ गावी गुनाट (ता. शिरूर) येथे देखील नेले होते. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयाने यापूर्वी १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी (१३ मार्च) त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
अद्यापही मोबाईल मिळेना
ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दत्तात्रय गाडे जवळ जो मोबाईल होता तो मोबाईल अद्यापही पोलिसांना सापडला नाही. त्या मोबाईलचा शोध सध्या सुरू आहे. आतापर्यंत तपासात काय झाले ? – घटनास्थळाचा पंचनामा – पिडीत तरूणीचा न्यायालयासमोर जबाब – प्रत्यक्षदर्शी इतर साक्षीदारांकडे चौकशी – आरोपी फिर्यादीची कपडे जप्त – सायनटेफिक अॅनालिसीससाठी कपडे पाठवले – आरोपी व फिर्यादीचे डीएनए सॅम्पल घेतले – गुन्ह्यात बीएनएसचे 64 (2) एम, 115 (2), 127 (2) – विरूध्द 7 गुन्ह्यांची माहिती मिळवली पीडित तरुणीवर अत्याचार झाले तिच्याबद्दल चुकीची माहिती वकिलानेच प्रसारमाध्यमांना दिल्याची माहिती आता समोर आली आहे.
एवढंच नाहीतर, जेव्हा या वकिलाला विचारलं चुकीची माहिती का दिली, तर त्याने पळ काढला. पहिल्या सुनावणीवेळी, आरोपीचा वकील ॲड सुमित पोटे यांनी माध्यमांशी बोलताना ‘आरोपीने पीडित तरुणीला साडेसात हजार रूपये दिले होते’ अशी माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र हा युक्तिवाद न्यायालयात केलाच नसल्याचं नंतर उघड झालं होतं. माध्यमांना खोटी माहिती देऊन पीडित महिलेच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्याचा या वकिलाचा प्रयत्न होता.