लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य
नांदेड : शहरापासून जवळच असलेल्या पासदगाव येथील पुष्पांजली माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. बदनामीच्या भीतीपोटी त्या मुख्याध्यापकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलल्या जात असून, सुनिल भानुदास कारामुंगे असे मुख्याध्यपकाचे नाव आहे.
पासदगाव येथील पुष्पांजली माध्यमिक शाळेचे सुनिल कारामुंगे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दत्तनगरमधील एका अल्पवयीन मुलीला व्हॉटसअॅपवर एक अश्लिल व्हिडिओ पाठविला होता. ही बाब त्या मुलीने आपल्या पालकांना सांगितली होती. पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी कारामुंगे यांच्याविरूद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणाचा तपास आश्विनी गायकवाड यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पो.नि. एस.डी. गुरमे यांनी दिली. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर बदनामी होईल, या भीतीपोटी सुनिल कारामुंगे यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मुलीच्या कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी?
कारामुंगे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रणव कारामुंगे याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुनिल कारामुंगे यांना घरी बोलावून आमच्या मुलीस अश्लील मेसेज का केला म्हणून प्रथमेश भुजंग टेंभूणवार, भुजंग मारोतराव टेंभूणवार, विद्या भुजंग टेंभूणवार, एक विधीसंघर्ष बालक व अन्य जणांनी मारहाण केली. तसेच दहा लाख रूपयांची मागणी त्यांच्याकडे केली. त्यामुळे सुनिल कारामुंगे यांनी खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, असे प्रणव कारामुंगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी प्रणव कारामुंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रथमेश भुजंग टेंभूणवार, भुजंग मारोतराव टेंभूणवार, विद्या भुजंग टेंभूणवार, एक विधीसंघर्ष बालक व अन्य जणांविरूद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.