Pune Crime: पुण्यात अभाविप’च्या कार्यालयाची तोडफोड ; ‘मनविसे’च्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेची बाजू मांडली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड
सार्थक वेळापुरे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की
नीलेश घायवळ याच्यावर आणखी गुन्हा
Pune News: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करुन कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह २० ते ३० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे (वय २०) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनुसार, ‘मनविसे’चे पदाधिकारी धनंजय दळवी, केतन डोंगरे, आशितोष माने, महेश भोईबार, हेमंत बोळगे यांच्यासह २० ते ३० जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात शिरले. अभाविपच्या कार्यालयातील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. कार्यालयाची तोडफोड करून त्यांनी अभाविपच्या कार्यालयातील भिंतीवर पत्रक चिकटवले. कार्यालयाला कुलूप लावून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून गेले, असे संजीवनी कसबे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.
अमित ठाकरे यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेची बाजू मांडली. तसेच, काल घडलेल्या घटनेची माहिती देखील दिली.
नीलेश घायवळविरुद्ध – आणखी एक गुन्हा दाखल
कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्यावर आणखी गुन्हा नोंदवण्यात आला असून, दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दीड महिन्यात घायवळवर दाखल झालेला हा ६ गुन्हा आहे.
याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच टेलीकम्यिुनेकशन ॲक्ट २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
माहितीनुसार, घायवळ २०२० पासून दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावर असलेले सीमकार्ड वापरत असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात आरोपी केल्यानंतर निलेश घायवळ हा परदेशात गेल्याची माहिती समोर आली. नंतर पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिलेले असताना तो कसा पसार झाला, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याची पडताळणी पुणे पोलिसांनी केली असता त्याने घायवळ ऐवजी गायवळ या नावाने पासपोर्ट काढल्याचे दिसून आले. तर त्याची सर्वच कागदपत्रे ही गायवळ असल्याचेही सिद्ध झाले. नंतर बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्याप्रकरणी घायवळवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी त्याला ब्लू कॉर्नर नोटीस बजाविली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला आहे. घायवळचा भाऊ सचिन यालाही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्ह्यात आरोपी केले आहे. घायवळ याच्यावर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घायवळच्या पारपत्राची पोलिस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजाविली आहे. याप्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात आली आहे.
Web Title: Pune crime abvp office vandalized in pune case registered against manvise office bearers