
Pune Land Scam: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने तब्बल १,८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, या जमीन व्यवहाराशी संबंधित निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी मुंढवा परिसरातील ही जमीन अमेडीया होल्डिंग्स कंपनीला मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करण्यात आले होते. यासंबंधीचे पुरावे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मिळाले आहेत. या खुलाशामुळे या वादग्रस्त प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं आहे.
राजकीय घडामोडींना वेग, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत रंगणार; कोणत्या पक्षाचे पारडे जड?
सदर जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून, तपास यंत्रणा याप्रकरणी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही नवे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील वादग्रस्त जमीन प्रकरणात आणखी धक्कादायक तपशील समोर आला आहे. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनीच ही जमीन अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीला मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध हालचाली केल्याचे दस्तऐवजी पुरावे समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येवले यांनी सर्वप्रथम जून महिन्यात बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेला पत्र लिहून ही जमीन मुळ महार वतनदारांची असल्याचा दावा केला. वतनदार भोगवटा भरण्यास तयार असल्याने त्यांना ती जमीन परत देण्यात येत असल्याचे नमूद करत, संस्थेला ती जागा तात्काळ रिकामी करण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर, जुलै महिन्यात त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरे पत्र पाठवून, संबंधित जमीन वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. वतनदारांची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी यांच्या नावावर असल्याने आणि त्यांनीच ती जमीन तब्बल ३०० कोटी रुपयांना पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स कंपनीला विकल्याने, अखेर ही जमीन अमेडीया कंपनीकडे जाण्यासाठी प्रशासनिक हालचाली वेगाने सुरू झाल्या.
या संपूर्ण व्यवहारात तहसीलदार येवले यांच्या सक्रिय भूमिकेमुळे, त्यांना हाताशी धरून जमीन हस्तांतरणाचा प्रयत्न गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. येवले यांनी बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाला पाठवलेली दोन्ही पत्रे आता समोर आली असून, तीच या घोटाळ्याचे महत्त्वाचे पुरावे ठरत आहेत.
Lakshman Hake News: बापाने ७० हजार कोटी पचवले, पार्थ पवार १५०० कोटींच्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने मुंढवा येथील १७.५१ हेक्टर (सुमारे ४४ एकर) जमीन बेकायदा विकत घेतल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हा एफआयआर पुणे शहराचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांनी दाखल केला आहे. तक्रारीनुसार, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी ९ जून २०२५ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक संचालकांना पत्र लिहून, संबंधित जमीन रिकामी करून ती अमेडीया कंपनीला देण्यासाठी हालचाल सुरू केली होती. मात्र, येवले यांनी हे पत्र कोणत्या विभागाला पाठवले होते, याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आलेला नाही.
एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, “या पत्राद्वारे येवले यांनी आपले अधिकार बेकायदा पद्धतीने वापरल्याचे दिसते.” या कारवाईमुळे सरकारी मालकीची असलेली जमीन खासगी कंपनीला देण्याचा गंभीर आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, ही ४४ एकर जमीन सध्या केंद्र सरकारच्या भारतीय वनस्पती सर्वेक्षण (Botanical Survey of India – BSI) या संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. बीएसआयच्या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वीच ही जमीन रिकामी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. या घोटाळ्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.