
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई (Photo Credit- X)
गेल्या २८ जानेवारी रोजी बारामती येथे ‘VSR वेंचर्स’चे लिअरजेट ४५ विमान लँडिंग दरम्यान कोसळले होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर देशातील विमान वाहतूक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, संबंधित कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
Press Note on Special Safety Audit of M/s VSR Ventures Pvt Ltd pic.twitter.com/T0uiIPbqqV — DGCA (@DGCAIndia) February 24, 2026
अपघातानंतर DGCA ने VSR वेंचर्सच्या तांत्रिक देखभालीच्या दर्जाची आणि सुरक्षा प्रक्रियांची सखोल तपासणी करण्यासाठी एक बहु-शाखीय पथक नियुक्त केले होते. या विशेष तपासणीतखालील गंभीर बाबी समोर आल्या आहेत. विमानांच्या देखभालीसाठी मंजूर असलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले. विमानांची उड्डाण योग्यता आणि उड्डाण ऑपरेशनच्या क्षेत्रात अनेक त्रुटी आढळल्या. एअर सेफ्टी आणि मेंटेनन्सच्या बाबतीत कंपनीने नियमांना हरताळ फासल्याचे समोर आल्याने, जोपर्यंत सुरक्षेचे निकष पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या चार विमानांना उड्डाण करता येणार नाही.
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक
दुसरीकडे, विमान दुर्घटना अन्वेषण ब्युरो (AAIB) या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तांत्रिक तपास करत आहे. विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मधून मिळालेला डेटा, वैमानिकाची शेवटची प्रतिक्रिया, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सोबत झालेला संवाद आणि हवामानातील बदल या सर्व अंगांनी तपास सुरू आहे. तांत्रिक बिघाड की मानवी चूक, हे शोधण्यासाठी विमानाचे अवशेष आणि तांत्रिक उपकरणांचे विश्लेषण केले जात आहे.
नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही चार्टर किंवा खाजगी विमान ऑपरेटरसाठी सुरक्षा मानकांशी तडजोड करणे महागात पडू शकते. अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा जीव गेल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. DGCA ने कंपनीला ‘डेफिशियन्सी रिपोर्टिंग फॉर्म’ बजावला असून, या त्रुटींचे मूळ कारण स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत सुरक्षेच्या मानकांची पुनर्स्थापना होत नाही, तोपर्यंत VSR वेंचर्सची ही चार विमाने हवेत झेपावू शकणार नाहीत. या कारवाईमुळे खासगी विमान वाहतूक कंपन्यांमध्ये खळबळ माजली असून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे आता महाग पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.