
Pune:“तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” म्हणत MPSC विद्यार्थ्याचे अपहरण; गाडीत कोंबले, पुढे जे घडलं ते...
मध्यरात्री तरुणाला गाडीत कोंबले
प्रसाद सूर्यवंशी हा तरुण पुण्यात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करतो. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो चिमण्या मारुती चौक परिसरात उभा होता. त्यावेळी चारचाकीतून काही जण तेथे आले. आरोपींनी प्रसादला “तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” असा जाब विचारला. त्यानंतर त्याच्याशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप आहे. काही वेळातच आरोपींनी प्रसादला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि तेथून निघून गेले.
मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच आखला कट
पोलिसांच्या माहितीनुसार, एमपीएससीची तयारी करणारी एक तरुणी प्रसाद आणि मुख्य आरोपी या दोघांच्या संपर्कात होती. दोघांशीही तिचे फोनवरून बोलणे होत असल्याचे आरोपीच्या लक्षात आले. याचा राग मनात धरून त्याने प्रसादचे अपहरण करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी त्याने आपल्या मित्राची मदत घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे.
मध्यरात्री पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाचं अपहरण; मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच अपहरण केल्याची पोलिसांची माहिती#Punenews #crimenews #punecrimenews #police #video #viralvideo #pune pic.twitter.com/tT6JQBiK4n — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 10, 2026
सीसीटीव्ही मुळे तपासाला मिळाली दिशा
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान संबंधित वाहन सिंहगड रोडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने त्या परिसरात सापळा रचला. वाहन अडवून पोलिसांनी त्यातील आरोपींना ताब्यात घेतले आणि प्रसाद सूर्यवंशीची सुखरूप सुटका केली.
हेही वाचा: Crime News: वर्षानुवर्षे साधूचा वेश,पोलिसांची धाड पडताच समोर आला १९८८ मधील गुन्हा
दोघांना अटक, साथीदारांचा शोध सुरू
या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर अपहरणात सहभागी असलेल्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींनी अपहरणामागे नेमका कोणता उद्देश ठेवला होता, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासांत अपहरणाचा छडा लावून तरुणाची सुखरूप सुटका केली.