सौजन्य फोटो - सोशल मिडीया
१४ ते १६ सप्टेंबर नियमित वेळा
गणेश चतुर्थीपासून सुरुवातीच्या तीन दिवसांत म्हणजेच १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत सुरू राहील. त्यानंतर उत्सवातील गर्दी वाढण्याच्या पार्श्वभूमीवर विस्तारित वेळापत्रक लागू होईल.
१७ ते २४ सप्टेंबर मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा
१७ ते २४ सप्टेंबरदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो सकाळी सहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत धावणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणपती मंडळांचे दर्शन घेणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच गणेशोत्सवातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या फेऱ्यांमधील अंतर कमी करण्यात आले आहे. या काळात मेट्रो दर पाच मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत याचा फायदा प्रवाशांना होण्याची शक्यता आहे.
विसर्जनासाठी सलग ४१ तास सेवा
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोने विशेष नियोजन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून २६ सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रो सेवा सलग सुरू राहणार आहे. म्हणजेच तब्बल ४१ तास अखंड मेट्रो सेवा उपलब्ध असेल. २७ सप्टेंबरपासून पुन्हा नियमित वेळापत्रक लागू होईल.
गणपती दर्शनासाठी कोणत्या स्थानकाचा वापर कराल?
मध्यवर्ती पुण्यातील गणपती मंडळांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी नियोजित स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्गिका १ वरील प्रवाशांनी कसबा पेठ स्थानकाचा, तर मार्गिका २ वरील प्रवाशांनी डेक्कन जिमखाना किंवा पीएमसी स्थानकाचा वापर करावा, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे.
मंडई स्थानकाबाबत विशेष सूचना
महात्मा फुले मंडई स्थानकावर दर्शनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे स्थानक प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान या स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवातील वाढती गर्दी, वाहतूक कोंडी आणि रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय लक्षात घेता मेट्रोच्या या विशेष वेळापत्रकामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.






