पुणे पोलीस दलातील "लिओ"ने घेतला अखेरचा श्वास; निरोप देताना खाकीही गहिवरली
पुणे/अक्षय फाटक: शहर पोलीस दलातील अमली पदार्थ तस्करांचा कर्दनकाळ असलेल्या “लिओ” या श्वानाने मंगळवारी (दि २६) सकाळी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीनगर मुख्यालयात असलेल्या डॉग स्कॉडमध्ये त्याने सकाळी साडे नऊच्या सुमारास शेवट झाला. तब्बल आठ वर्ष शहर पोलीस दलात कर्तव्य बजावले. त्याच्या जाण्याने पोलीस दलात देखील हळहळ व्यक्त केली गेली.
पोलीस दलात श्वानाचे स्थान महत्वाचे आहे. किचकट गुन्ह्यांचा छडा लावण्यासोबतच आरोपींचा माग काढण्यासाठी ते पोलिसांचे कान-नाक आणि डोळे म्हणून काम करतात. लिओ २०१६ मध्ये पुणे शहर पोलीस दलात दाखल झाला होता. तेव्हा तो दोन महिन्याचा होता. जातीने तो लॅब्राडोर मेल होता. अवघ्या दोन महिन्यांचा असल्यापासून शहर पोलिसांच्या सहवासात होता. नंतर त्याने पोलीस दलाचे खडतर प्रशिक्षण देखील पार पाडले. प्रशिक्षणाची बाराखडी पुर्ण केल्यानंतर लिओ आपल्या कामत तरबेज झाला. अल्पावधीतच त्याने पोलिसांच्या बरोबरीने कर्तव्य पार पाडत आपली कामगिरी चोख पार पाडण्यास सुरूवात केली.
अमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्याच्या कामात पोलिसांना मदत करण्यासाठी त्याला खास तयार करण्यात आले होते. त्याने अनेक अमली पदार्थ तस्कारांचा शोध घेतला. लोणी काळभोरमधील एका शेतात उत्पादन होत असलेला गांजा लिओने शोधून काढला होता. त्यासोबतच कोंढवा भागात पोलिसांनी २०१९ नायजेरियन व्यक्तीकडून अमली पदार्थ व ५० किलो गांजा पकडला होता. त्यात लिओची भूमिका महत्वाची ठरली होती. लिओचे हँडलर म्हणून पोलीस हवालदार उमेश रास्कर काम करत होते. त्यांना लिओच्या निधनानंतर अश्रु अनावर झाले.
पोलीस मुख्यालयात लिओला मानवंदना देण्यात आली. नंतर त्याच्यावर शासकीय इतमामात पुणे स्टेशन जवळील पुणे महानगर पशु विद्युत दाहिनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे एमओबी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, श्वान पथक, सलामी गार्ड उपस्थित होते.
हेही वाचा: Crime News: ‘दागिने विक्रीसाठी आला अन् नेपाळी चोरटा…’; गुन्हे शाखा युनिट पाचची मोठी कामगिरी
चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी घेऊन आलेला नेपाळी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी साडे आकरा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अनिल मिनसिंग खडका (वय २५, रा. माळवाडी हडपसर, मुळ.नेपाळ) असे त्याचे नाव आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार अमित कांबळे आणि तानाजी देशमुख यांच्या पथकाने केली आहे. अनिल खडका याने २२ नोव्हेंबर रोजी हडपसर येथील मार्वेला आर्को या उच्चभ्रु सोसायटीत चोरी केली होती. तो मुळचा नागपूर येथील आहे.