Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरणातील 'त्या' दोन डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करा, पोलिसांचे पत्र
पुणे: कल्याणीनगर भागात घडलेल्या हायप्रोफाईल पोर्शे अपघातप्रकरणात त्या चालक अल्पवयीन मुलाचे रक्ताच्या नमुन्यांची आदलाबदल करणाऱ्या दोन डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने रद्द करण्याबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांना पत्र पाठविले आहे. नुकताच पुणे पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यातील तत्कालीन दोन पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव देखील पाठविला आहे. त्यानंतर आता हे मोठे पाऊल पोलिसांनी उचलले आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
कल्याणीनगरमध्ये १९ में रोजी मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परतताना धनिकाच्या अल्पवयीन पूत्राने वेगात अलिशान भरधाव कारने दुचाकीवरील इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पूत्राला वाचविण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय पॉवरचा वापर, धनिक असल्याचा माज आणि पोलीस यंत्रणा तसेच ससून रुग्णालयाला हाताला धरून झालेला रक्ताच्या नमुन्याची आदलाबदल यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
रक्तबदल प्रकरणात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील विभागप्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक केली होती. अटकेनंतर तेही सध्या येरवडा कारागृहात आहेत. अद्याप त्यांचाही जामीन झालेला नाही. नंतर आता पुणे पोलिसांनी मोठे पाऊल उचलत या दोघांचेही वैद्यकीय परवाना रद्द करावा असे पत्र महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठविले आहे.
येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे तसेच रात्रपाळीवर असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांच्या निलंबनानंतर त्यांची विभागीय चौकशी पुर्ण झाली. नंतर त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला आहे.
अधिकाऱ्यांना बडतर्फ करा; पोलिसांकडून प्रस्ताव दाखल
कल्याणीनगर येथील हायप्रोफाईल तसेच राज्यभरात गाजलेल्या पोर्शे अपघातप्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी ‘पोलीस महासंचालक’ कार्यालयाकडे पाठविला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. त्यापुर्वी त्यांना कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी २४ मे रोजी निलंबित करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी असे प्रस्ताव पाठविलेल्या दोन अधिकाऱ्यांचे नाव आहे. कल्याणीनगरमध्ये १९ में रोजी मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परतताना धनिकाच्या अल्पवयीन मुलाने वेगात अलिशान भरधाव कारने दुचाकीवरील इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पूत्राला वाचविण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय पॉवरचा वापर, धनिक असल्याचा माज आणि पोलीस यंत्रणा हाताला धरून झालेला सर्वप्रकार आणि ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगत मिळालेला जामीन, यामुळे प्रकरण राज्यात गाजले होते.