पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: कल्याणीनगर येथील हायप्रोफाईल तसेच राज्यभरात गाजलेल्या पोर्शे अपघातप्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी ‘पोलीस महासंचालक’ कार्यालयाकडे पाठविला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. त्यापुर्वी त्यांना कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी २४ मे रोजी निलंबित करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी असे प्रस्ताव पाठविलेल्या दोन अधिकाऱ्यांचे नाव आहे. कल्याणीनगरमध्ये १९ में रोजी मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परतताना धनिकाच्या अल्पवयीन मुलाने वेगात अलिशान भरधाव कारने दुचाकीवरील इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पूत्राला वाचविण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय पॉवरचा वापर, धनिक असल्याचा माज आणि पोलीस यंत्रणा हाताला धरून झालेला सर्वप्रकार आणि ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगत मिळालेला जामीन, यामुळे प्रकरण राज्यात गाजले होते.
पुण्यातील पोर्शे अपघाताला ६ महीने पूर्ण; निष्पाप जीव गमावणाऱ्यांना तरुणाईने वाहिली आदरांजली
याप्रकरणात अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर तडकाफडकी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन येरवडा पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे तसेच रात्रपाळीवर असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले. त्यानूसार त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा प्रयत्न
राज्यभरात गाजलेले तसेच पुणे पोलिसांवर दाट संशय निर्माण करणारे पोर्शे अपघातप्रकरणात पोलिसांनी वेगवेगळे तीन गुन्हे यासंदंर्भाने दाखल केले. या एकूण प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक केली. तेव्हापासून सर्वजण अद्यापही कारागृहात आहेत. त्यांना जामीन मिळू दिलेला नाही. दरम्यान, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
रक्त बदलण्यास सांगणाऱ्या आरोपीला सुप्रीम कोर्टाचा दणका
कल्याणीनगर भागात एक अपघात घडला होता. पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच गाजले. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्याचे रक्ताचे नमुने बदलण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता. दरम्यान आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान सुप्रीम कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.