मुंबई: मुळशी येथील वैष्णवी हगवणे प्रकरण अद्याप ताजे असतानाच मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. जान्हवी सिद्धांत शिरसाट नावाच्या महिलेने सिद्धांत यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावली असून, मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी तसेच हुंडाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ साली सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आणि सिद्धांत शिरसाट यांची ओळख झाली. मुंबईतील चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सिद्धांत यांनी आत्महत्येची धमकी देत तिला भावनिकरित्या ब्लॅकमेल केले आणि लग्नासाठी दबाव टाकला. त्यांच्या अशा वर्तनामुळे तिने लग्नासाठी होकार दिला. दरम्यान, 14 जानेवारी 2022 रोजी सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत बौद्ध पद्धतीने विवाह केल्याचा दावाही पिडीत महिलेने केला आहे. तसेच आपल्याकडे पुरावे असल्याचेही महिलेने म्हटलं आहे. याच काळात महिलेला गर्भधारणाही झाली, मात्र सिद्धांत शिरसाट यांनी जबरदस्तीने महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही महिलेने नोटीसीत केला आहे.
लग्नानंतर सिद्धांत शिरसाट यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगत छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. धक्कादायक म्हणजे, त्यांचे विवाहापूर्वीचे संबंध आणि इतर महिलांसोबतचे संबंध समोर आल्याननंतर समोर आल्यानंतर त्यांनी धमक्या देण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर , “जर तू पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करीन,”अशी धमकीही त्याने महिलेला दिल्याचा आरोप केला आहे.
या सर्व प्रकारानंतर 20 डिसेंबर 2024 रोजी महिलेने शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. पण सिद्धांत शिरसाट हे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणावर कोणतीही ठोस कारवाई न करता प्रकरण दाबल्याचा आरोप या नोटीसमध्ये केला आहे. या प्रकरणात महिलेच्या वकिलांनी सिद्धांत शिरसाट यांनी पिडीत महिलेला नांदविण्यासाठी घरी घेऊन जावे आणि न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच, जर सिद्धांत शिरसाट तसे करणार नसतील तर त्यांच्यावर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी कायदेशीर नोटीस ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत बजावण्यात आली आहे.
पिडीत महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांनी तिला फोन करून धमकी दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे. “फोन करू नकोस, नाहीतर तुझे संपूर्ण कुटुंब गुंडाकडून संपवीन,” अशी धमकी त्यांनी दिल्याचा दावा महिलेने केला आहे. याचबरोबर, “माझे वडील मंत्री होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत,” अशा प्रकारचा धाक दाखवून दबाव टाकल्याचेही महिलेने आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद केले आहे.
संजय शिरसाट हे राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न करता हे प्रकरण दबावाखाली दाबल्याचा आरोपही संबंधित महिलेकडून कायदेशीर नोटीसच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या प्रकरणात त्वरित आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. “हे प्रकरण गंभीर असून, मंत्रिपदाचा गैरवापर करून जर पीडितेला न्यायापासून दूर ठेवले जात असेल, तर याविरोधात कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.” असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.