
Satara Doctor Death case Update :
Satara Doctor Death case Update: सातारा डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास समिती स्थापन केली आहे. असे वृत्त समोर आले होते. पण हे वृत्त खोटे आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक केली आहे. अशी माहिती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. या संबंधी सुषणा अंधारे आज फलटण पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेणार आहेत. पण त्यापू्र्वी त्यांनी काही पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “मला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत कोणताही वैयक्तिक आकस नाही. ते आज संध्याकाळी सभा घेऊन उत्तर देणार आहेत, परंतु त्यांनी तसे करण्याऐवजी माझ्यासोबत पोलीस ठाण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यास मदत करावी,” असे विधान शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केले. “मी तुमची बहीण आहे, तुमच्या गावची पाहुणी आहे. तुमच्या सभ्यपणावर माझा विश्वास आहे.” असही त्यांनी नमुद केलं. पण त्याच वेळी यावेळी त्यांनी, संपदा मुंडे प्रकरणात एसआयटीची कोणतीही अधिकृत नेमणूक झालेली नाही. सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.” असं सांगत या प्रकरणात एसआयटी नेमल्याचा दावा फेटाळून लावला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेमणुकीचे पत्र वाचले असता, याप्रकरणात तपासावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे, असे म्हटले आहे. काल भाजपचा एक बोलघेवड्या नेत्याने, माझ्याकडे सरकारने केलेल्या नियुक्तीचे पत्र असल्याचे सांगितले. खरंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी. अशी आमची मगणी आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयात रिट याचिकादेखील दाखल करणार आहोत. हे आत्महत्या प्रकरण राजकारणापासून प्रभावमुक्त राहू शकत नाही,” असे विधान शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केले. त्या उस्मानाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मी फलटणला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नाही. मी माझी भूमिका आधी मांडली आहे. डॉ. संपदा यांनी मृत्यूपूर्वी जे पत्र लिहून ठेवलं आहे. त्याला सुसाईड नोट म्हणून ग्राह्य धरले जावे, पिडीतेच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदवले जावेत, या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करण्यात यावी,या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेतील त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. चाकणकर यांच्याबाबत विचारले असता, रुपाली चाकणकर यांच्याबाबत आम्हाला काहीही बोलायचे नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण सुनील तटकरे यांना मात्र चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवायचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते. या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज निंबाळकर फलटण शहरात सभा घेणार आहेत.
ही सभा आज संध्याकाळी सहा वाजता ऐतिहासिक गजानन चौकात पार पडणार असून, निंबाळकर या सभेत नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.