संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत डॉक्टरांचा संप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Satara Doctor Death Case: छत्रपती संभाजीनगर: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरुन राज्यभरातील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन छेडण्यात आले आहे. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.
फलटणमधील डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरात डॉक्टरांच्या विविध संघटनानंकडून काम बंद आंदोलन केलं जात आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप डॉक्टरांचा आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे. फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्येनंतर राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. त्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. “नो सेफ्टी, नो सर्विस! या आशयाचे पोस्टर आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी हातामध्ये घेतले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईमध्ये या आंदोलनामध्ये नायर मार्ट संघटनेकडून आवाज उठवला जात आहे. “डॉ. मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे” अशी भूमिका घेण्यात आली आहे. या प्रकरणात रिटायर्ड न्यायाधीश आणि महिला सदस्याचा समावेश करत एसआयटी नेमावीअशी डॉक्टरांची मागणी आहे. संपदा मुंडे हिच्या कुटुंबाला 5 कोटींची मदत, जलदगती कोर्टात सुनावणी, आणि डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करावा अशा मागण्याही आहेत. आंदोलन सुरू असल्याने रुग्णालय परिसरात ओपीडी सेवा ठप्प झाली आहे, फक्त इमर्जन्सी विभाग सुरू असून त्यामुळे रुग्णांना मोठा फटका बसत आहे. आज फक्त ओपीडी सेवा बंद, पण न्याय न मिळाल्यास उद्या पासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करू असा इशारा डॉक्टरांनी सरकारला दिला असून प्रशासनावर डॉक्टरांचा रोष दिसून येत आहे.
मार्ड संघटनेचे सर्व डॉक्टर आक्रमक
मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी मार्ड संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद करण्यात आली. बंद पुकारल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मार्ड संघटनेचे सर्व डॉक्टर आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आत्महत्या केलेल्या संपदा मुंडेंच्या परिवाराची भेट घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडित मुंडे परिवाराचे सांत्वन केले असून न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचे देखील खासदार सुळे म्हणाल्या आहेत. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. राजकारण बाजूला ठेवून, माणुसकीच्या, नैतिकतेच्या नात्याने आम्ही या कुटुंबासोबत आहोत असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.






