बीड: भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. सतीश भोसलेची एकामागोमाग एक प्रकरणे उजेडात येत आहेत. काही दिवसांपूर्वी शिरूर कासार येथे त्याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. खोक्या भोसले आणि त्याच्या साथीदारांनी परिसरातील हरणांची शिकार करून त्यांचे मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे लवकरच त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरूर तालुक्यातील बावी गावातील महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसलेच्या साथीदाराला हरणांची शिकार करण्यास आडकाठी केली. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या दोघांवर हल्ला केला. या प्रकरणी 7 मार्च रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक ! रेशनकार्डमध्ये नाव न जोडल्याने टोळक्याकडून दोघांना मारहाण
पाटोदा येथील वन अधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, त्यांना मृत प्राण्यांचे सांगाडे आढळले. प्राथमिक तपासणीत हे सांगाडे हरीण आणि काळविटाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या साथीदारांवर अनेक हरणे आणि ससे मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून हरणांचे शिंग जप्त केले असून, त्याचा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे.
Pune Crime: भर रस्त्यात BMW थांबवून लघूशंका; पुण्यात महिला दिनी मद्यधुंद तरुणांकडून अश्लील वर्तन
या प्रकरणावर वनप्रेमी सिद्धार्थ सोनावणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आरोप लावणे आणि गुन्हा दाखल करणे यात मोठा फरक आहे. 200 हरणांची शिकार झाल्याचे बोलले जात आहे, मात्र त्याची अधिकृत नोंद नाही. काही महिन्यांपूर्वी येथे काळवीटाचे सांगाडे सापडले होते. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. प्राणीमित्र संघटना या लढाईत पाठिंबा देईल. तसेच, शिकारीचे प्रकार रोखण्यासाठी ज्या ठिकाणी पाणवठे आहेत, त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.