वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. क्षुल्लक कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात आता पिंपरीत रेशनकार्डमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे जोडण्यासाठी कागदपत्रे आणि पैसे दिले असता नाव न जोडल्याने तिघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास पिंपरीच्या नेहरूनगर येथे घडली.
हेदेखील वाचा : Pune Crime: भर रस्त्यात BMW थांबवून लघूशंका; पुण्यात महिला दिनी मद्यधुंद तरुणांकडून अश्लील वर्तन
मुकेश काशिनाथ बनसोडे (वय ३५, रा. पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रुपेश गोरखा (वय ४०), तारामती गोरखा (वय ४०), गुड्डी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश हे त्यांच्या बहिणीसोबत फोनवर बोलत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी मुकेश यांना कुटुंबातील सदस्यांची नावे रेशनकार्डमध्ये जोडण्यासाठी पैसे आणि कागदपत्रे दिली होती.
पण, दोन वर्ष झाले तरी ती जोडली गेली नाहीत, असे म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली. मुकेश यांनी त्यांच्या बहिणीला बोलावून घेतले असता आरोपींनी मुकेश आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत नोंद झाली असून, संत तुकारामनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
कौटुंबिक वादातून चौघांकडून मारहाण
दुसऱ्या एका घटनेत, कौटुंबिक वादातून चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वानवडीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. महेंद्र अनिल कवडे (वय ३६, रा. गंगा क्वीन सोसायटी, घोरपडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मनोज गायकवाड याच्यासह चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. कवडे यांनी याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेदेखील वाचा : PCMC News: पिंपरीत पोलिसाचा प्रताप: 12 च्या ठोक्याला पोलिस स्टेशनसमोर केले सेलिब्रेशन; पोलिस आयुक्तांनी थेट…