Maharashtra ATS raid in Borivali: महाराष्ट्र एटीएसने भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील बोरिवली गावात टाकलेल्या गुप्त छाप्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून, या भागात देशविरोधी कारवायांचे जाळे सक्रिय असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. बोरिवलीमधील साकिब नाचन या कुटुंबाने कथितरित्या एक स्लीपर सेल उभा केला होता. या सेलच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवले जात होते आणि भारतविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, बोरिवलीत ‘शरीयत-ए-अल-शाम’ नावाची एक अतिरेकी विचारसरणी रुजवली जात होती. या मॉडेलनुसार, बोरिवली परिसर स्वतंत्र ‘शरिया’ राज्य म्हणून कार्यरत करण्याचा कट रचण्यात आला होता. विशेष म्हणजे, या तथाकथित प्रशासनात १५ तरुणांना मंत्रिपदासारखे अधिकार देण्यात आले होते. तब्बल १०० हून अधिक तरुणांचा यात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
सिक्रेट फ्लाईट, लँडिंगची जागा ऐनवेळी बदलली.. बांगलादेशमधून कशा पळून आल्या शेख हसीना? माहिती समोर
नाचन कुटुंबातील काही सदस्यांनी भारताविरोधात उघडपणे भाषणे दिल्याचेही समोर आले असून, त्यांचे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स एटीएसने ताब्यात घेतल्या आहेत. या माध्यमातून बोरिवली आणि पडघा भाग भारताचा भाग नसल्याचा दावा करण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या गटाने स्वतंत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करून परदेशी दहशतवादी संघटनांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत मिळाले आहेत. छाप्यात एटीएसने १९ मोबाईल फोन्स जप्त केले असून, ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या फोन्समधील चॅट्स, सोशल मीडिया अॅप्स आणि कॉल डेटा तपासण्यात येत आहे. यामधून अनेक महत्त्वाच्या लिंक समोर येण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तरुणांनी अलीकडेच तुर्कीला दौरा केला होता. तपास यंत्रणा त्यांच्या प्रवासाचा इतिहास तपासत असून, तुर्कीमध्ये ISIS च्या काही सदस्यांशी त्यांचा संपर्क झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, हे तरुण आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांच्या संपर्कात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, एजन्सी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. संबंधित तरुणांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.