बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर सध्या सामूहिक हत्याकांडासाठी मानवतेविरुद्धचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याअंतर्गत बांगलादेशात सुनावणी सुरु आहे. जुलै २०२४ मध्ये ढाकात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर २५ हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. दरम्यान शेख हसीना यांना त्यांचे उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवावे लागेल असे मानले जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या जीवालाही धोका असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशा परिस्थितीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांनी ऑगस्टमध्ये त्यांच्या निवासस्थानी हल्ला झाला त्यावेळी नेमका देश कसा सोडला याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशी विमान वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांग्लादेश सोडून भारतात आश्रय घेतला. बांगलादेशी विमान वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ढाका येथील शेखी हसीना यांच्या निवासस्थावर जमावाने हिंस हल्ला केला. अशा परिस्थितीत शेख हसीना यांना बांगलादेशच्या बगबंधू हवाई तळावरुन हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला त्यांचे हेलिकॉप्टर प्रथम भारताच्या कोलकात्यामधील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळवर उतरणार होते. परंतु नंतर हा निर्णय बदलण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे हेलिकॉप्टर दिल्लीतील गाझियाबाद येथील हिंडन एअर फोर्स बेसवर उतरवण्यात आले.
दुपारी तीन वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने बगबंधू विमानतळावरुन उड्डाण घेतले. या लष्करी हेलिकॉप्टरला एअर ट्रॅफिक कंट्रोलने विशेष कोड दिला होता. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर त्याचे ट्रान्सपॉन्डर बंद करण्यात आले. यामुळे त्याची ओळख होऊ शकणार नाही. शेख हसीनांसोबत त्यांची बहिण देखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्यानंतर हेलिकॉप्टरनमे बंगाल सीमेजवळ येता पुन्हा ट्रान्सपॉन्डर सुरु केले. आणि भारतीय एजन्सींशी संपर्क साधला. भारत सरकारने शेख हसीना यांचे विमान उतरवण्याची परवानगी दिली आणि दिल्लीतील गाझियाबादमध्ये त्यांचे विमान उतरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ढाका आणि कोलकाता येथील हवाई वाहतूक नियंत्रणादरम्यान हॉटलाईनचा वापर करण्यात आला. यामुळे लोकांना हसीना यांचे हेलिकॉप्टर प्रशिक्षण घेत असल्याचे वाटले. अशा पद्धतीने ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांगलादेशातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यांच्या देश सोडून गेल्यानंतर बांगलादेशात अराजकता पसरली होती. शेख हसीना देश सोडून नेमक्या कशा गेल्या असा प्रश्न लोकांना पडला होता. परंतु सध्या त्यांच्यावर मानवतेविरूद्धचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.