
बिहारमध्ये चार अल्पवयीन मुलींचा विषारी पदार्थ सेवनाने संशयास्पद मृत्यू; पाचवी बचावली, नेमके कारण काय?
पाच मुली शेतात गेल्या आणि चौघींचा मृत्यू
पाचही मुलींचे वय साधारण १० ते १४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे कळाले आहे. त्या एकत्र शेताकडे गेल्या होत्या. तेथे त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याचे समोर आले. त्यानंतर चौघींची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. पाचवी मुलगी मात्र घरी परतली. तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलीच्या जबाबातून मिळाली वेगळीच माहिती
त्या संकटातु वाचलेल्या मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणींनी विषारी पदार्थाबाबत उत्सुकतेतून तो सेवन करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या म्हणण्यानुसार, इतर मुलींनी पदार्थ पाण्यासोबत घेतला; मात्र तिने अगदी कमी प्रमाणात घेतल्यानंतर तो थुंकून टाकला. त्यामुळे तिचा जीव वाचल्याचे तिने सांगितले. तिच्या कुटुंबीयांनीही तातडीने उलटी होण्यासाठी घरगुती उपचार केल्याचे समजले आहे.
मात्र पोलिसांच्या तपासात वेगळा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेमागे वेगळे कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सरस्वतीपूजेच्या दिवशी मुली काही मुलांसोबत फिरताना दिसल्या होत्या. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रागावल्याचे आणि त्यातून त्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बचावलेल्या मुलीच्या जबाबावरून समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तपास अद्याप सुरू असून या कारणाला अंतिम निष्कर्ष मानता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अंत्यसंस्कारानंतर पोलिसांना मिळाली माहिती
या घटनेतील सर्वांत गंभीर बाब म्हणजे चौघी मुलींचे अंत्यसंस्कार घटनेच्या दिवशीच करण्यात आले. त्यावेळी पोलिसांना याची माहिती देण्यात आली नव्हती. स्थानिक माध्यमांतून घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे मृतदेहांचे शवविच्छेदनही होऊ शकले नाही. घटनेचे नेमके कारण आणि विषारी पदार्थ कोठून मिळाला, याचा तपास आता केला जात आहे.
कुटुंबीयांचा वेगळाच दावा
मृत मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कथित कारणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुली खेळण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या आणि नंतर त्या शेतात मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे या घटनेमागे नेमके काय घडले, याबाबत अजूनही अस्पष्टताच आहे.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून विविध शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. बचावलेल्या मुलीचा जबाब, स्थानिक नागरिकांची माहिती आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे घटनेचे सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे चार अल्पवयीन मुलींच्या मृत्यूमागचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.