सनम खान ठाण्यातील मुलीने केले पाकिस्तानी मुलाशी लग्न
ठाणे/सारिका साळुंखेः मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरीक नसरुल्लाह सोबत लग्न केले होते. भारताला खिजविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयएसने त्या दोघांचे फोटोशूट करून सोशल मीडियावर व्हायरलही केले होते. अगदी तसाच प्रकार ठाण्यात घडला आहे.
अंजूसारखीच भारतात परत
ठाण्यातील तरुणीने पाकिस्तानात जाऊन लग्न केले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणाशी तिची ओळख झाली होती. त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. यानंतर तिने गुपचूप पाकिस्तान गाठले आणि तिकडे लग्न उरकून ती पुन्हा अंजूसारखीच भारतात आली आहे. ठाणे पोलिसांना याची खबर मिळताच तिला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी सुरु केली आहे. सनम खान असे या तरुणीचे नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या मुलीचे नाव नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान आहे. याशिवाय पोलिसांनी तिच्यावर पासपोर्ट अधिनियम 1967 च्या कलम 12 नुसार पासपोर्ट कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हाही दाखल केलाय.
फेसबुकद्वारे झाली ओळख
फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर ठाण्यातील एका तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. काही महिने त्या व्यक्तीसोबत राहिली आणि 17 जुलैला भारतात परतली आहे.
भारताच्या सुरक्षेला धोका
पाकिस्तान हा भारताविरोधात कटकारस्थान करणारा देश आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने सनम ही खरोखरच लग्न करण्यासाठी गेली होती की हेरगिरी किंवा अन्य काही कारणासाठी गेली होती का याचा तपास पोलीस करत आहेत
कोण आहे सनम खान?
ठाण्यातील सनम अर्थात नगमा नूर मकसूदचे आधीच लग्न झाले असून तिला 2 मुलीही आहे. 2015 मध्ये तिने आपले नाव बदलून घेतले आणि सनम खान केले, तर मुलींची नावेही बदलली. त्यानंतर तिची बशीर अहमद या पाकिस्तानी तरूणाशी ओळख झाली आणि पुढे प्रेमात रूपांतर झाल्यावर लग्न करायचे ठरवले. मात्र पाकिस्तानात जायचे असल्याने तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
ऑनलाईन लग्न
24 फेब्रुवारी, 2024 रोजी ऑनलाईन लग्न केले आणि त्यानंतर तिने पाकिस्तानात जाण्याचा अर्ज केला. जूनच्या पहिल्या आठवड्यात ती ठाण्याहून दिल्ली – अमृतसर प्रवास करत गेली आणि त्यानंतर तिने पाकिस्तानी दुतावासांसह संपर्क करून वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात प्रवेश केला. दोन्ही मुलींसह पाकिस्तानातील एबोटाबाद येथे बशीरशी लग्न केले.
आईसाठी भारतात परतली
सनम आपल्या मुली आणि पती बशीरसह पाकिस्तानातील रावळपिंडी येथे शिफ्ट झाली. मात्र भावाचा फोन आल्यानंतर आईची तब्बेत बिघडली आहे कळल्यामुळे तिने पाकिस्तानी दुतावासाचा संपर्क साधत पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. यामुळे पोलीस सध्या चांगलेच हादरले असून तिची कसून चौकशी सुरू आहे.