संग्रहित फोटो
पाटस : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे वेगवेगळ्या भागात नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘मावशी, साप आला!’ असे सांगून वृद्ध महिलेला घाबरवत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील एका आरोपीला यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील दापोडी येथे घडली आहे.
ज्येष्ठ महिला शेतकरी सुनंदा बापू रूपनवर (वय ६५ वर्षे) या शेतात ऊस लागवड करून झाडाजवळ बसल्या असताना सुमित उर्फ घाऱ्या साळुंखे व त्याचे दोन साथीदार मोटारसायकलवरून तेथे आले. दोघांनी ‘मावशी, साप आला!’ असे ओरडून त्यांना घाबरवले. घाबरून पळत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून गळ्यातील सोन्याचे डोरले व काळ्या मण्यांची पोत जबरदस्तीने हिसकावली आणि मोटारसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी रूपनवर यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत सुमित उर्फ घाऱ्या ईश्वर साळुंखे (वय १९, रा. बोरीपार्धी, ता. दौंड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली आहे. पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर करीत आहेत.
बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले
मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर चारचाकी चालक तरुणाची कार अडवून त्याच्याशी वाद घालण्याचा बहाणा करत चौघा चोरट्यांनी त्याला मारहाण केली आहे. त्यानंतर कारच्या खिडकीतून हात घालून तरुणाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले आहेत. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील बागणी येथील ३४ वर्षीय तरुणाने नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.






