Crime News: पुण्याच्या हडपसरमध्ये बंद फ्लॅट फोडून तब्बल 'इतके' लाख लुटले; पोलिसांचा तपास सुरू
पुणे: पुणे शहरात अनेक गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. पुण्याच्या हडपसर भागात घरफोडीचा गुन्हा घडला आहे. हडपसर परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ५ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अनंता पवार (वय ६२, रा. धारवाडकर कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त गावी गेले होते. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडले. तसेच, बेडरूमध्ये घुसून कपाट उचकटून चोरट्यांनी ४ लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पवार कुटुंबीय सोमवारी गावाहून परतले. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
हडपसरसोबतच सदाशिव पेठेतील सोसायटीत घरफोडीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला सदाशिव पेठेतील सोसायटीत राहायला आहेत. ९ नोव्हेंबर रोजी त्या धनकवडीतील शंकर महाराज मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. दुपारी त्या मंदिरातून घरी आल्या. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरल्याचा प्रकार महिलेच्या लक्षात आला. महिलेने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेला धक्का देऊन चोरटे पसार झाले. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे तपास करत आहेत.
नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक
सोलापूर-पुणे रस्त्यावर भल्या पहाटे वाहन तपासणीसाठी नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुणासह त्याची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, मोटारचालक चेतन सिंग, दुचाकीवरील सहप्रवासी सायली टिंगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दोन पोलिसांसह चौघे जखमी
सोलापूर महामार्गावरील मांजरी भागात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रवेशद्वार येथे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी लावण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलीस अंमलदार संकेत गांगुर्डे व त्यांचे सहकारी ड्युटी बजावत होते. लोखंडी बॅरिकेट्स उभा करून पोलीस वाहने चेकींग करतात. दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास वाहन तपासणी सुरू होती. तेव्हा लोणी काळभोर टोलनाक्याकडून भरधाव दुचाकीवर आलेल्या कार्तिकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याने लोखंडी बॅरिकेट्सला धडक दिली. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, बारटक्के, तसेच कारमधून उतरुन तपासणीसाठी थांबलेले कारचालक चेतन सिंग यांना धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी सायली टिंगे पडल्याने तिला दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकी चालक पसार झाला. सहायक निरीक्षक रोकडे अधिक तपास करत आहेत.