Rajendra Hagawane and Sushil Hagawane Arrested: मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती. गेल्या सात दिवसांपासून हे दोघेही फरार होते. अखेर आज पहाटे बावधान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक केली होती. पण सात दिवसांपासून हे दोघे तळेगाव परिसरातच लपून बसले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने दोघानांही ताब्यात घेतले.
१७ मे रोजी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये काही मित्रांसोबत जेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. या दृश्यांचा व्हिडीओ आता समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे सरसावला. आरोपी सतत ठिकाण बदलत असल्यामुळे त्यांचा शोध घेणे हे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र, अखेर पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट परिसरातून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली.
१६ मे रोजी वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर बावधन पोलिसांनी तिचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद ऐश्वर्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली होती. मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे त्या वेळेस फरार झाले होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट परिसरातून या दोघांना अटक केली आणि न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.