
Pune Police, Visa Violation, Breaking News, Religious Conversion,
या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पर्यटन व्हिसावर येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हालचाली आणि नियमांचे पालन यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अमेरिकन नागरिक पर्यटनासाठी पुण्यात आले होते. मात्र शहरात राहत असताना ते ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असल्याची माहिती समोर आली. एका कॅब चालकाने पोलिसांकडे तक्रार दाखल करत दावा केला की, या नागरिकांनी त्याला धर्मांतरासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखवले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान संबंधितांकडून धार्मिक प्रचारासाठी वापरली जाणारी पत्रके आणि लीफलेट मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५३, ६५ आणि ६६ वर्षे वयोगटातील हे नागरिक १९ ते २१ एप्रिल दरम्यान भारतात दाखल झाले होते. २६ एप्रिलपासून ते पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये राहत होते आणि पुणे परिसरात फिरत होते. २७ एप्रिल रोजी सकाळी शुक्रवार पेठ भागात त्यांनी एका खासगी कॅब चालकाला बायबलसह इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील धार्मिक पत्रके दिली. “ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे,” असे सांगत त्यांनी त्या चालकाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या घटनेनंतर संबंधित कॅब चालकाने परिसरात सुरू असलेल्या रॅलीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांनाही ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. तपासादरम्यान त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात धार्मिक प्रचारासाठी वापरली जाणारी पत्रके जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत Foreigners Registration Office Pune (FRO) ने स्पष्ट केले की, हे नागरिक पर्यटन व्हिसावर असूनही धार्मिक प्रचार करत होते, जे नियमांचे उल्लंघन आहे.
परदेशी नोंदणी कार्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकडे यांनी सांगितले की, इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टनुसार व्हिसा अटींचे उल्लंघन केल्यामुळे तिघांनाही ‘लीव्ह इंडिया नोटीस’ देण्यात आली आहे.