मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची खाजगी सचिव दिशा सालियानच्या मृत्यू प्रकऱणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी दिशाच्या मृत्यूबाबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच, सतिश सालियन यांची फौजदारी रिट याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेसोबत संलग्न करण्याची विनंतीही हायकोर्टाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात सतिश सालियन स्वतः न्यायालयात उपस्थित राहिले.
सुनावणी सुरू होताच वकील निलेश ओझा यांची विनंती उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. याबाबत बोलताना निलेश ओझा म्हणाले की, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. आमच्याकडून संपूर्ण तयारी झाली आहे. पण उद्याच्या सुनावणीत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. पण दुसरीकडे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांची बहीण, वंदना चव्हाण या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सक्रिय राजकारणात आहेत. त्यामुळे या सुनावणीला अन्याय होण्याची शक्यता वाटते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयाकडून दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवले जाऊ शकते. आमच्या विनंतीनुसार, न्यायालयाने याचिका दुसऱ्या खंडपीठासमोर चालवण्याचे निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर ही विनंती करण्यात आली, ती मान्य झाली आहे. उद्यापासून या याचिका न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर उद्या तातडीच्या सुनावणीसाठी मांडण्याचा प्रयत्न केला जाईल . तसेच, हायकोर्टाच्या रजिस्ट्रारला यासंबंधीची आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही ओझा यांनी दिली.
सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूला आजही संशयाच्या नजरेने पाहिले जाते. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मलाड येथे एका गगनचुंबी इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र, या प्रकरणावर अजूनही वाद सुरूच आहेत.पोलिसांनी दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, काही लोकांनी हा जबरदस्तीने घडवून आणलेला प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही घटनांचा काही संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. भाजप नेत्यांनी दिशाच्या मृत्यूबाबत अधिक चौकशीची मागणी केली होती.
Tiger Memon Asset : टायगर मेमनची संपत्ती केंद्र सरकारला सोपवा- मुंबई विशेष न्यायालयाचे आदेश
अनेक लोकांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, मुंबई पोलिसांनी याला अपघाती मृत्यू ठरवत प्रकरण बंद केले. काही मीडियाने या प्रकरणात बलात्कार किंवा हत्या झाल्याचा दावा केला होता. मात्र, अधिकृत पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये अशा कोणत्याही बाबी आढळल्या नाहीत.मुंबई पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याचे सांगितले असले, तरी काही लोक अजूनही नव्याने चौकशी करण्याची मागणी करत आहेत. दिशाच्या मृत्यूमागचे सत्य उघड होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.