नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; पोहोण्यासाठी पाण्यात उतरला अन् बुडून मृत्यू झाला
वैजापूर : तालुक्यातील ढेकू नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना तालुक्यातील राहेगाव येथे शनिवारी (दि.४) सकाळच्या सुमारास घडली. यातील एकजण मृत पावला असून, अन्य दोघांना वाचविण्यात यश आले आहे. अजय पांडुरंग बोरकर (वय २२, रा. राहेगाव) असे या नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहेगाव येथील अजय हा आपल्या आईला ढेकू नदीवर कपडे धुण्याच्या कामात मदत करत होता. अत्यंत साधे आणि रोजचे असलेले हे काम त्या दिवशी अजयसाठी काळ बनून आले. मदत करत असताना तोल जाऊन अजय नदीच्या खोल पाण्यात पडला. हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले त्याचे चुलत भाऊ ओम सतीश बोरकर आणि अक्षय बाळू शेलार यांनी जराही वेळ न दवडता, त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि अनपेक्षित खोली यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले.
दुर्दैवाने, ते अमोलला वाचवू शकले नाहीत. अमोलला वाचवण्याच्या प्रयत्नात ओम आणि अक्षय देखील नदीपात्रात अडकले. मात्र, तेथे उपस्थित नागरिकांनी वेळीव धाव घेत या दोघांना नदीतून सुखरूप बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
राहेगाव येथील तलाठी अमरसिंह तेजराम यांनी ही माहिती पदमपुरा अग्निशमन केंद्राला कळवली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी बी. कदम आणि अधिकारी संजय कुलकर्णी, वैभव बाकडे यांच्यासह अग्निशामक जवानांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
ढेकू नदीपात्रात राबवली शोध मोहीम
या पथकात जवान छगन सलामवाद रितेश शंकर कसूरे, विशाल धरडे, कमलेश सलामवाद, सकेत निकाळजे, सचिन शिंदे, विनोद बम्हनी, रवि दुधे, सचिन फुले आणि वाहन चालक एन. आर. घुगे व तुळशीराम सानप यांचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या प्रशिक्षित जवानांनी तातडीने नदीपात्रात शोध आणि बचाव मोहीम सुरू केली.
अथक प्रयत्नातून मृतदेह बाहेर
अनेक तासानंतर अजय बोरकर याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह कायदेशीर प्रक्रियेसाठी शिऊर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.