Delhi Accident : सीमापुरी इमारत अपघातात आतापर्यंत चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्यात आढळले मानवी अवशेष, सौजन्य : आयएएनएस
पूर्व दिल्लीच्या सीमापुरी परिसरातील इमारत अपघातात (Delhi Accident ) आतापर्यंत चौघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये 21 वर्षीय गुलाफ्शा, 56 वर्षीय हजा बीबी, 33 वर्षीय नूसरा व चार वर्षीय एका मुलाचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहे. दरम्यान, लहान मुलाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, बचाव कार्याच्या दरम्यान मातीच्या ढिगाऱ्यातून शरीराचे काही भाग व मानवी अवशेष सापडले. त्यांचीही ओळख अद्याप झालेली नाही. डीएनएच्या माध्यमातून त्यांची ओळख करावी लागणार आहे.
या घटनेच्या संदर्भात विशिष्ट कायद्याच्या कलमांतर्गत सीमापुरी पोलीस स्टेशनमध्ये 8 ऑक्टोबरला एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. इमारत कोसळण्याचे कारणही शोधले जात आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, घटनास्थळावरील बचाव मोहिम आता पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. ढिगाऱ्याखालून मिळालेले अवशेष आता फॉरेन्सिक तपासासाठी व इतर पैल्लूंच्या पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, दिल्लीच्या सीमापुरी परिसरात बुधवारी पाच मजल्यांची एक इमारत कोसळल्याची घटना घडली होती. एका वृत्तंसस्थेशी संवाद साधताना शाहदराचे पोलीस आयुक्त राजेंद्र प्रसाद मीणा यांनी सांगितले की, आतापर्यंत सात जणांचा जीव वाचवण्यास बचाव पथकाला यश आले आहे.
त्याआधी नॉर्थ ईस्ट दिल्लीचे जिल्हाधिकारी अजय कुमार यांनी पत्रकारांना सांगितले होते की, प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत बुधवारी दुपारी 3 ते 3.15 च्या सुमारास कोसळली. आम्हाला 3.25 ला कॉल आला, ज्यात लोकेशन व व्हिडीओद्वारे माहिती देण्यात आलेली.
तसेच अजय कुमार हे डिस्ट्रिक्ट डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (डीडीएमए)चे प्रभारी देखील आहेत. ते म्हणाले की, या घटनेची माहिती तातडीने डीडीएमए आणि एनडीआरएफच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. त्याचमुळे काही जणांचे प्राण आम्हाला वाचवता आले.






