राजधानी दिल्लीत प्रदूषणापासून मिळेना दिलासा; अनेक भागात AQI 400 पार
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच राजधानीत दिल्लीत हवेची गुणवत्ता चांगलीच बिघडली आहे. दिल्लीतील हवा विषारी झाली असून, परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजपासून GRAP-4 लागू करण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. आज सकाळी 6 च्या सुमारास सरासरी AQI 481 होता आणि सर्वत्र यापेक्षाही गंभीर परिस्थिती दिसून आली.
संबंधित बातम्या : राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणात वाढ; शाळांना सुट्टी तर बांधकामांवर गंभीर परिणाम
सध्या दिल्लीतील हवा या ऋतूमधील सर्वांत खराब पातळीवर पोहोचल्याचे सोमवारी सकाळच्या आकडेवारीतून समोर आले आहे. एनसीआरमधील बहुतांश भाग धुक्याच्या चादरीत दिसून आला होता. तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) सकाळी 6 वाजता दृश्यमानता 150 मीटर होती. धुक्यामुळे काही उड्डाणे 30 मिनिटे ते एक तास उशीर होत आहेत. अद्याप कोणतेही विमान रद्द झाल्याचे वृत्त दिले गेले नाही. असे असताना आता विमानतळ अधिकाऱ्यांनी प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी विमानांच्या वेळा तपासण्याचा सल्ला दिला आहे.
आजपासून GRAP-4 लागू
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजपासून राजधानी GRAP-4 राबविण्यात येत आहे. काल रात्री, दिल्लीचा सरासरी AQI 475 वर पोहोचला आणि जवळजवळ सर्व महत्वाच्या ठिकाणी AQI पातळी 400 च्या वर राहिली. परिस्थिती पाहता हवामान खात्यानेही आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून GRAP-IV नियम लागू करण्यात आले आहेत. सम-विषम, ऑफलाइन वर्ग पूर्ण बंद करणे, कार्यालयात 50 टक्के उपस्थिती आणि इतर आपत्कालीन उपाय यासारखे निर्णय सरकारकडून घेतले जाऊ शकतात, अशीही माहिती आहे. एनसीआरमध्येही परिस्थिती गंभीर आहे.
दिल्लीतच नव्हे तर एनसीआर भागातही प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. दिल्लीत सरासरी AQI 481 होता, तर नोएडामध्ये सरासरी AQI 384, गाझियाबादमध्ये 400, गुरुग्राममध्ये 446 आणि फरिदाबादमध्ये 320 होता.
GRAP 4 लागू केल्यानंतर काय होणार बदल?
केंद्र आणि दिल्ली सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. याशिवाय सम-विषम तत्त्वावर रस्त्यावर खासगी वाहने चालवण्याबाबत निर्णय घेता येईल.
संबंधित बातम्या : देशात थंडी वाढली! पाच राज्यांना रेड अलर्ट जारी, महाराष्ट्रात काय स्थिती