'जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील'; खासदार ओमराजे निंबाळकर यांचं विधान
पंढरपूर : माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील, असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी अजितदादांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करून अर्थ खाते देण्यात आलं. 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजितदादांना जर पंतप्रधान कारवाई करणार असे म्हणत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजप सूडबुद्धीने कारवाई करत आहे. पक्ष फोडीचे राजकारण केले’.
तसेच मराठा समाज शांततेत आंदोलन करत असताना लाठीचार्ज केला. आता ते म्हणतात, ‘बटेंगे तो कटेंगे’ याला माझे एकच उत्तर आहे. ‘जुडेंगे तो जितेंगे’ असे म्हणत त्यांनी मोदी पंतप्रधान असताना ‘हिंदू खतरे में…’ कसा? असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीएसटी लावला जातो. मात्र, धन दांडग्यांना सूट दिली जाते. शेतमालाला भाव मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला.
दडपशाहीचे राजकारण लोकांना नसते मान्य
यावेळी त्यांनी मतदार उमेदवारांची तुलना करत असतो. दडपशाहीचे राजकारण लोकांना मान्य नसते. राजकारणात कामाची स्पर्धा महत्त्वाची असते. त्याच पद्धतीने अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखाना शेवटच्या घटका मजत असताना तो चांगल्या पद्धतीने सुरू करून शेतकऱ्यांना चांगला दर दिला. कोरोनाच्या महामारीत आर्थिक नुकसान करून नागरिकांचा जीव वाचवला, हीच पुण्याई त्यांना निवडून देईल, असा विश्वास व्यक्त केला.
अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे पूर्ण करून…
अभिजीत पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे पूर्ण करून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदानरूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावे’, असे आवाहन केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी सांगितले की, ‘आबांना उमेदवारी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रस्थापितांनी शेकडो तरुणांच्या उताऱ्यावर कर्ज काढून त्यांचे भविष्य उद्धवस्त केले. त्यांच्या अश्रूंच्या हुंकरामधून आबांना उमेदवारी मिळाली आहे. पांढऱ्या शुभ्र कापडात गणेश कुलकर्णींचा मृतदेह घरी आला. त्यांच्या लहान मुलांच्या हंबरड्यामधून आबांची उमेदवारी आली आहे’, अशा शब्दांत विद्यमान आमदार यांचा समाचार घेतला.
हेदेखील वाचा : राज्यात बॅग्स तपासणीचा मुद्दा तापला; कराड विमानतळावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगेची तपासणी