Accused in gauri lankesh murder case Shrikant Pangarkar Eknath Shinde party entry
जालना : विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे जोरदार राजकारण रंगत आहे. पक्षांतर वाढली असून अनेक नवीन चेहरे पक्षामध्ये दाखल होत आहे. पण सध्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत आहे. मात्र शिंदे गटामध्ये एका गुन्हेगारी प्रकरणातील आरोपीने पक्षप्रवेश केला आहे.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीने शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालन्यात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. श्रीकांत पांगारकर असं या आरोपीचं नाव असून आता राजकारणामध्ये सुरुवात करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. आरोपीने फक्त पक्षप्रवेश केला नाही तर त्यांना पक्षाचे पद देखील देण्यात आले आहे.
हे देखील वाचा : पुण्यात मुख्यमंत्र्यांचा लांबलचक ताफा; वसंत मोरे भडकून म्हणाले,’आयोग झोपा काढतोय?
मीडिया रिपोर्टनुसार, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याची लगेच जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आरोपीच्या पक्षप्रवेशामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे. पत्रकारांच्या हत्येचा आरोपी असलेल्या व्यक्तीने शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे विरोधक आणि महाविकास आघाडीमधील नेते रोष व्यक्त करत आहेत.
पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या 2017 साली घडलेल्या प्रकरणामध्ये एसआयटीने अमोल काळे नावाच्या संशयित व्यक्तीला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं होतं. श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता, हे एसआयटीच्या तपासात पुढे आलं होतं. 2018 मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. मागील महिन्यामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर केला. त्यामुळे तो आता जामिनावर बाहेर आहे. यानंतर आता त्याने राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. जामीनावर बाहेर असलेल्या आरोपीने महाराष्ट्रातील विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्याने रोष व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : भुजबळांंच्याच घरात दोन गट; समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात?
सुप्रिया सुळे यांनी देखील श्रीकांत पांगारकरच्या राजकीय प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. सुळे म्हणाल्या आहेत की, “अतिशय धक्कादायक ! गुन्हेगारांना सामाजीक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण…! प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करुन घेतले. या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे. म्हणूनच महाराष्ट्राला खोके सरकारला नाकारणारे आणि कायद्याचा आब आणि आदर करणारे शासन हवे आहे,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
अतिशय धक्कादायक ! गुन्हेगारांना सामाजीक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण…! प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके…
— Supriya Sule (@supriya_sule) October 20, 2024