"५४ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात..."; फडणवीसांनी सांगितला मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्लॅन
नांदेड: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षाच्या प्रचारसभा देखील सुरू झाल्या आहेत. आज नांदेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती भाजपचे उमेदवार भीमराव केराव यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. भीमराव केराव हे किनवट मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आले आहे. दरम्यान आजच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीका केली आहे. तसेच मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर देखील भाष्य केले आहे.
नांदेडच्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर भीमराव केराव यांना अडीच वर्षे विरोधी पक्षात काम करावे लागले. या मतदारसंघात एकही रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकारने दिला नाही. त्यानंतर २०२२ मध्ये आपले सरकार आणि भीमराव केवार यांच्या मतदारसंघात निधी येण्यास सुरुवात झाली. उच्च पातळी बंधारे बांधल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे.”
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या बंधारे बांधल्याने हा संपूर्ण परिसर पाणीदार होणार आहे. निम्न पैनगंगा धरण आहे त्या पद्धतीने बांधल्यास ९५ गावे बुडण्याची भीती होती. मी बैठक घेऊन तो निर्णय बदलला आहे. ९५ गावांना मी विस्थापित होऊ देणार नाही. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आपल्या सरकारने जे काम केले आहे, त्याची नोन इतिहासात केली जाईल. कारण गोदावरीच्या खोऱ्यात जवळपास ५० टीएमसीची तूट आहे. त्यामुळे हा मराठवाडा सातत्याने दुष्काळमुक्त भाग म्हणून केंद्र सरकारकडे व राज्य सरकारकडे त्याची नोंद आहे.”
“मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढील पिढीस आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. ५४ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आले तर मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळात राहील. या प्रकल्पाला हजारो कोटी रुपये लागणार आहेत. मात्र आमच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी सांगितले, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी चिंता करू नका. लागतील तेवढे पैसे देऊ. पण आपल्याला मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचे आहे. ”
फडणवीसांची ठाकरेंवर टीका
सुरतेला जाऊन महाराजांचे मंदिर बांधणार असे ठाकरे म्हणाले. २२ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सूरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला आहे. तुम्ही म्हणता सगळीकडे छत्रपती शिवरायांचे मंदिर उभारणार. मग सर्वात पहिले मंदिर मुंब्रा येथे उभारू, आम्ही सर्व तुमच्या मदतीला येतो. खरेतर यांच्याकडे बोलायला काही नाही. गेल्या अडीच वर्षांत राज्यात परिवर्तन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपण जे काम केले आहे, त्याचे हे उत्तर देऊ शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इंग्रजांवर राग होता, म्हणून त्यांनी सूरत लुटली असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता तुम्हाला औरंगजेबाचे नाव घेण्याची लाज वाटू लागली. मतांसाठी किती लांगूनचालन करणार? हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या नावातून तुम्ही हिंदूहृदयसम्राट काढून टाकले. उद्धवजी भारतातला राष्ट्रवादी मुसलमान आहे तो देखील औरंगजेबाला आपला नेता मानत नाही.