डिलिमिटेशन बिलामुळे मविआमध्ये वादाची ठिणगी? शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अन् ठाकरे गट आक्रमक

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवार गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. संजय राऊतांनी राष्ट्रवादीला थेट आव्हान दिले, तर विजय वडेट्टीवारांनी शरद पवारांवर जहरी टीका केली.
Dispute within the Maha Vikas Aghadi as Sharad Pawar’s NCP supports the Delimitation Bill nrpm
डिलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीमध्ये वाद (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • डिलिमिटेशन बिलावरून महाराष्ट्रात तापलं राजकारण

  • राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी

  • विजय वडेट्टीवार अन् संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिका

Political News : पुणे : डिलिमिटेशन बिलाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने केंद्रासह राज्यामध्ये राजकारण तापले आहे. शरद पवारांनी मोदी सरकारच्या विधेयकाला पाठिंबा दिल्याने काँग्रेस व ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांचे पाठीत खंजीर खुपसण्याच्या राजकारणाचा इतिहास असल्याचे म्हणत जहरी टीका केली. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे केंद्रातील या विधेयकाचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवर होणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार यांनी इंडिया आघाडीच्या निर्णायला पाठ दाखवून डिलिमिटेशनच्या विधेयकाला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दाखवली आहे. त्यांनी जाहीरपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमधील अतंर्गत वाद समोर आला असून याबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनीही सूचक वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला थेट आव्हान दिले. खासदार राऊत म्हणाले, “आत्तापर्यंत या देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल्याचे निदर्शनास आले आहे, जे चुकीचे आहे. हे चुकीचं म्हणजे चुकीचेच आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. यापुढे अशा पक्षाने फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. तुमचे आठ खासदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले आहेत, भाजपच्या माध्यमातून नाही. यामधील बहुसंख्य मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा प्रभाव आहे. शिरुरचा मतदारसंघ असेल, शिवसेनेशिवाय तुम्ही तिथे जिंकू शकत नाही हे मी अमोल कोल्हेंना सांगू इच्छितो. आम्ही त्या जागा लढू. कसे जिंकून येताय बघतो. आमची माढ्यातही ताकद आहे. आम्ही लढू आणि काय आहे महाराष्ट्र हे दाखवू. आमचाही पक्ष फोडला पण आम्ही शरण नाही गेलो,” असे थेट आव्हान संजय राऊतांनी दिले.

Vijay Wadettiwar Attacks On Sharad Pawar: पाठित खंजीर खुपसण्याचा इतिहास...; काँग्रेसचा शरद पवारांवर जहरी टिका

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "शरद पवार यांनी संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचारधारेला पुढे नेण्यासाठी समर्पित केले आहे. अशा नेत्यांकडून धर्मांध, जातीयवादी देश उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तींशी हातमिळवणी करून त्यांच्या सोबत जातील असं कधीच वाटल नव्हतं. पण पवारांचा पाठीत खंजीर खुपसण्याचा इतिहास आहे. हे महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा जन्म सत्तेसाठी झाला आहे आणि सत्ता घेऊनच हे जग सोडणे हे त्यांचे ध्येय आहे."

'३ वर्षे दोन्ही राष्ट्रवादीचं भांडणाचं नाटक...', राज ठाकरेंचा डिलिमिटेशन बिलावरून NCPवर घणाघात

डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करण्यापूर्वी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने या बैठकीला उपस्थिती लावली नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी ऑनलाइन पद्धतीनेही उपस्थिती लावली नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत या वादाचे पडसाद आता राज्यात दिसत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील या विधेयकाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Q

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाने पाठिंबा का दिला?

A

डिलिमिटेशन विधेयकाबाबत शरद पवार गटाने सकारात्मक भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Q

संजय राऊत यांनी शरद पवार गटाला काय आव्हान दिले?

A

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये शिरूर आणि माढा मतदारसंघांत शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवेल, असे सांगत थेट आव्हान दिले.

Q

विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांवर काय टीका केली?

A

विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर पाठीत खंजीर खुपसण्याचा इतिहास असल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म सत्तेसाठी झाल्याचेही ते म्हणाले.