Dilip Walse Patil's daughter Purva Walse Patil gave a strong speech to the opponents
आंबेगाव : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राजकारण जोरदार रंगले आहे. यामध्ये महायुतीने एकतर्फी विजय मिळवून देखील सत्ता स्थापन न केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. यामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांचा आठव्यांदा विजय झाला आहे. मात्र यंदा केवळ दीड हजार मतांच्या फरकाने त्यांचा विजय झाला. यानंतर त्यांची प्रकृती देखील बिघडली होती. यावरुन देखील विरोधकांनी टीका केल्यामुळे दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोष व्यक्त केला आहे.
पूर्वा वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला रोष व्यक्त केला आहे. त्यांचे वडील आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत विरोधकांनी खालच्या पातळीवर वक्तव्य केले होते. विरोधकांनी घेतलेल्या आभार मेळाव्यात बोलताना “लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल”, असे विधान केले होते. यावर आता दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पूर्वा वळसे पाटील यांनी सोशल मीडियावरील पोस्ट करत म्हणाल्या की, “काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक दुर्दैवी अपघात झाला. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ते या दुखापतीतून जिद्दीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही संपूर्ण कुटुंब या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली असते. थोड्याच दिवसात ते या संकटावर सुद्धा मात करून नक्कीच पूर्वीसारखे व्हावेत अशी आम्ही रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परंतु काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या आभार मेळाव्यात त्यांच्या प्रकृती बद्दल बोलताना “लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल” असे अभद्र वक्तव्य केले गेले.”
आंबेगाव तालुक्याचं राजकारण कधीच असं नव्हतं पण त्याचा थर काही लोकांमुळे खूपच खाली गेला आहे विरोध विरोधाच्या ठिकाणी असावा पण अशी नीच वृत्ती जर कोण ठेवत असेल तर मला वाटत नाही ही लोक पुढे ही तालुक्याच्या राजकारणाच्या लायकीची आहेत म्हणून…@Dwalsepatil योद्धा ❤️ pic.twitter.com/zJN9gzLJtT
— Tejasp (@Teju1007) December 1, 2024
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “हे ऐकल्यानंतर काय बोलावे मला सुचत नाही. काही दिवसांपूर्वी वळसे पाटील साहेबांचा फोटो ज्यांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात लावला होता तेच आज साहेबांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत? तुम्ही नक्की निवडणुका लढा, जिंका, त्यात हरकत असण्याचे काही कारण नाही परंतु या सर्व गोष्टी करत असताना उन्माद किती असावा? सत्ता मिळवण्याच्या नादात आपण किती खालच्या पातळीला जात आहोत? शत्रुत्व करण्याच्या नादात आपण कोणतीच मर्यादा ठेवली नाही का? सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या तालुक्यातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का? तालुक्यात पस्तीस वर्षे जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल असे बोलताना आपली जीभ जराही कचरली नाही का?” असा सवाल पूर्वा वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पूर्वा वळसे पाटील पुढे म्हणाल्या, “कृतघ्नपणाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी राजकारण आणि निवडणुका हेच सर्वस्व आहे का? एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्ही मरणाची कामना करणार का? माणूस आणि माणुसकीला काहीच किंमत उरली नाही का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटून आले आहे. असे काही ऐकून त्यावर उत्तर देण्यापेक्षा मला नकोच ते राजकारण असे वाटू लागले आहे.” अशा शब्दांत पूर्वा वळसे पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.