संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले (फोटो - सोशल मीडिया)
ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारा लागला आहे. मात्र महायुतीला एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील अद्याप सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एक आठवडा झाल्यानंतर देखील सरकार स्थापन न झाल्यामुळे विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली होती.
महायुतीमध्ये खातेवाटपावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. मात्र ऐनवेळी बैठकी रद्द करुन एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. यामुळे ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे. विरोधकांनी एकनाथ शिंदे हे खरेच आजारी आहेत की नाराजीसाठी करत आहेत अशी टीका केली आहे. यावरुन आता शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिरसाट म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते. काल त्यांचा ताप 105 वर होता. सत्तेचे समीकरण आता निश्चित झाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत येऊन आराम करतील. त्यानंतर उद्या शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर शिवसेनेचा कृती आराखडा ते सांगतील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्याकडून विषय संपला
तसेच एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्या बदल्यात गृहखाते व नगर विकास या खात्यांची मागणी केली आहे. मात्र ही खाती देण्यास भाजपचा नकार आहे. यामुळे सत्ता स्थापनेचे घोंगडे भिजत पडले आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले की, “मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्याकडून विषय संपलेला आहे. आता गृह, महसूल किंवा इतर खात्यांबाबत महायुतीत कोणतीही भांडणे सुरू नाहीत. महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील,” असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांची नाही तर मांत्रिकाची गरज आहे. तसेच ते शपथविधी सोहळ्याला तरी येणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. या टीकेवर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, “संजय राऊत हे माणुसकी नसलेले व्यक्ती आहेत. शिंदे यांच्या प्रकृतीची काळजी करण्याऐवजी ते जादूटोण्याची भाषा बोलत आहेत. त्यांना संस्कृती आणि संस्कार नाहीत. संजय शिरसाट पुढे म्हणाले, संजय राऊत यांनी केलेल्या जादूटोण्यावरच उतारा करण्यासाठी आम्ही दरे गावात गेलो होतो. बंगालच्या जादूगाराचीही जादू आमच्यावर चालली नाही, हेही राऊतांना माहीत आहे,” असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊन नका
संजय शिरसाट यांनी पुढे एकनाथ शिंदे यांच्याबाबत सूचक वक्तव्य केले. शिरसाट म्हणाले की, “दाढीला कुणीही हलक्यात घेऊ नये. दाढीने विधानसभेला आपली कमाल दाखविली. जे रोज उठून शिंदेवर टीका करतात, त्यांना जागा दाखवली. राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसला शिंदेंनी जागा दाखविली. ही ताकद दाढीमध्ये आहे. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊन नका,” असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला.