Uddhav Thackeray's car stopped at Goa Maharashtra border
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये वाद विवाद सुरु असून अनेक आरोप केले जात आहे. प्रचार सभांमध्ये नेते अनेक गंभीर आरोप व वक्तव्य करत आहेत. पण सध्याचे राजकारण हे नेत्यांच्या तपासणीवर फिरते आहे. निवडणुकीमध्ये चुकीचे प्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोग एक्शनमोडमध्ये आली आहे. नेत्यांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदा वणीमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेते आक्रमक झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा औसा येथे प्रचार सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ शूट करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची उलटी तपासणी देखील घेतली. यानंतर आता सत्ताधारी नेत्यांची देखील अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे. यावरुन राजकारण तापलेले असताना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचण्यात आले. उद्धव ठाकरे यांची गाडी गोवा महाराष्ट्र सीमेवर अडवण्यात आली.
आज उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्गात तीन प्रचार सभा आहेत. यावेळी गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवर इन्सुली चेक पोस्टवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना अडवण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या तपासणीचा आज पुन्हा एकदा प्रकार घडला. गोव्यात विमानतळावर उतरुन गाडीने सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुली चेक पोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली. ज्या अधिकाऱ्याने गाडी अडवली, तो क्षणात तिथून गायब झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीची काच खाली केली. ते संतापलेले दिसत होते. त्यांच्यासोबत यावेळी गाडीमध्ये शेजारी पुत्र तेजस ठाकरे बसले होते. उद्धव ठाकरे यांची तिसऱ्यांदा तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे असे काय घबाड आहे असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जात आहे.