गिरीश रासकर/ अहिल्यानगर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एकंदरीत राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे यामध्ये दोन्हीही आघाड्यांना बंडखोरांचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून तर आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत युती व आघाडी कडून बंडखोरांची मन धरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता यामध्ये काही मतदारसंघांमध्ये त्यांना यश आले असून काही मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपली भूमिका ठाम ठेवल्याने युती व आघाडीला निवडणुकांमध्ये मोठे डोकेदुखी ठरणार आहे.
नगर जिल्ह्यात बारापैकी ८ मतदारसंघात बंडखोरी झालेली असून यामध्ये चारच मतदारसंघात सरळ लढती होणार आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणाला तसेच अंतर्गत हेवेदावे असलेल्या ठिकाणी बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधामध्ये भाजपाचे राजेंद्र पिपाडा यांनी अर्ज कायम ठेवला आहे तर दुसरीकडे सात विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपले अर्ज माघारी न घेतल्यामुळे जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये बंडखोरी ही दोन्ही पक्षांकडून झाली आहे असे चित्र दिसून येत आहे तर दोन मतदारसंघांमध्ये फक्त सरळ लढत होणार आहे.
नगर शहर, शिर्डी
नगर शहर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बंडखोरी केली आहे. त्या पाठोपाठ शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याबरोबर भाजपाचे बंडखोर राजेंद्र पिपाडा यांनी आपला उमेदवारी अर्ज तसाच ठेवला आहे पण ममता पिपाडा अपक्ष अर्ज हा मागे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विखे विरुद्ध महाविकास आघाडीतर्फे प्रभावती घोगरे यांची प्रमुख लढत पहायला मिळणार आहे.
श्रीगोंदा
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी दोन्ही पक्षांमध्ये झालेली आहे या ठिकाणी भाजपाच्या सुवर्णा पाचपुते या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या दुसरीकडे महाविकास आघाडीचे माजी आमदार राहुल जगताप हे बंडखोर म्हणून निवडणूक लढवत आहे त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.
पारनेर
पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे या ठिकाणी माजी आमदार विजय औटी व माजी नगराध्यक्ष विजय औटी या दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज हा कायम ठेवला आहे तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या सुद्धा उमेदवारी अर्ज हा ठेवला आहे. तर या ठिकाणी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते व खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहे त्यामुळे पारनेरमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळत आहे.
नेवासा
नेवासा मतदारसंघांमध्ये भाजपाने बंडखोरी केली आहे यामध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवला आहे या मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख व एकनाथ शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत दिसून येणार आहे.
अकोले, पाथर्डी शेवगाव
अकोले मतदारसंघांमध्ये माजी मंत्री पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी माघार न घेतल्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरी झाले आहे या ठिकाणी अकोल्यामध्ये शरद पवार पक्षाकडून अमित भांगरे तर त्यांच्या विरोधामध्ये महायुतीने डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी दिलेली आहे मात्र या ठिकाणी भाजपाचे वैभव पिचड यांनी बंडखोरी केली आहे. तर पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे व अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले यांच्यामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे.
कर्जत जामखेड, संगमनेर, राहुरी
कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार विरुद्ध माजी मंत्री व भाजपाचे विद्यमान आमदार राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे तर संगमनेर मतदारसंघांमध्ये महसूल मंत्री राहिलेले विद्यमान आमदार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध महायुतीचे अमोल खताळ अशी लढत होणार आहे. राहुरी मतदारसंघांमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे विरुद्ध भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये लढत होणार आहे.
श्रीरामपूर, कोपरगाव
श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरी झाली आहे या ठिकाणी माजी आमदार लहू कानडे यांनी बंडखोरी केली आहे. या ठिकाणी आघाडीकडून हेमंत ओगले तर महायुतीकडून भाऊसाहेब कांबळे हे मैदानात आहे तर कोपरगाव मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून संदीप वर्पे यांची सरळ लढत होणार आहे. तर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेले कोल्हे कुटुंबीयांची भूमिका कोपरगावमध्ये निर्णायक ठरणार आहे.