effective is Manoj Jarange Patil in Maharashtra Elections 2024 Exit Poll Results
जालना : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. निवडणूक आयोगाकडून 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान घेण्यात आले. मतदारांनी मोठ्या उत्साहाने सकाळी सात वाजल्यापासून मतदान केले. त्यामुळे 4 हजार 140 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये सरासरी 65.11 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. पावणे दोन लाखांहून नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे राज्यामध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे याची उत्सुकता लागली आहे. आता एक्झिट पोलचे आकडे समोर येत असून यामध्ये मनोज जरांगे पाटील किती प्रभावी ठरले आहेत हे समोर येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यामध्ये मागील दीड वर्षापासून मराठा आरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन, उपोषण व मोर्चा यामधून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. यामुळे राज्याचे राजकारण जोरदार रंगले होते. जरांगे पाटील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका देखील केल्या होत्या. तसेच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ व जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेकदा शाब्दिक चकमक झाल्याचे देखील दिसून आले. मात्र आचारसंहिता लागेपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऐनवेळेला मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेपासून माघार घेत कोणताही उमेदवार उभा केला नाही. तसेच कोणाला पाडा असे स्पष्ट नाव घेऊन सांगितले नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे विधानसभेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील असा अंदाज असताना त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय आहे एक्झिट पोल?
आता विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडली असून मराठा मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे याचे एक्झिट पोल समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोल डायरी एक्झिट पोलमध्ये महायुतीला १२२ ते १८६ तर महाविकास आघाडी- ६९ ते १२१ जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर चाणक्य एक्झिट पोलमध्ये महायुती १५२ ते १६० जागा आणि महाविकास आघाडी -१३० ते १३८ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मॅट्रिझचा एक्झिट पोलमध्ये महायुती १५० ते १७० जागा व महाविकास आघाडीला ११० ते १३० जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे. रिपब्लिक एक्झिट पोलमध्ये महायुतीला १३७ ते १५७ जागा आणि महाविकास आघाडी १२६ ते १४६ जागा मिळवण्यात यश मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबोरबर SAS एक्झिट पोलमध्ये महायुतीला १२७ ते १३५ जागा व महाविकास आघाडीला १४७ ते १५५ जागेवर विजय मिळवतील असा अंदाज आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महायुती विरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी देखील एक्झिट पोलमध्ये मात्र महायुतीच्या बाजूने कौल असल्याचे चित्र सध्या तरी आहे. त्यामुळे मराठा मतदारांवर जरांगे पाटील यांच्या आवाहनाचा तितकासा प्रभाव पडला नसल्याचे सध्यस्थितीमध्ये समोर येत आहे. मात्र निकालाच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल.